मिरज : श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाला २६ सप्टेंबरपासून प्रारंभ | पुढारी

मिरज : श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाला २६ सप्टेंबरपासून प्रारंभ

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज येथील श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाला २६ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली या संगीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती बाळासाहेब मिरजकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

यावेळी मिरजकर म्हणाले की, ९ दिवस संगीत महोत्सव चालणार असून अनेक दिग्गज कलाकार या संगीत महोत्सवात आपली सेवा देणार आहेत. शास्त्रीय गायनात प्रसिद्ध असलेल्या विदुषी यशस्वी सरपोतदार (पुणे) या पहिले पुष्प गुंफणार आहेत. त्यांच्या शास्त्रीय गायनाने या संगीत महोत्सवाची सुरुवात होणार आहे. २६ तारखेला सायंकाळी ७ वाजता त्यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात प्रदान करण्यात येणारा कै. संगीतकार राम कदम पुरस्काराचेही वितरण करण्यात येणार आहे. २०२१ चा पुरस्कार की-बोर्ड वादक केदार परांजपे (पुणे) तर २०२२ चा पुरस्कार सारगेम विजेत्या अंजली गायकवाड व नंदिनी गायकवाड (अहमदनगर) यांना देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव यांच्याहस्ते व विजय राम कदम यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी केयुर कुरुलकर हे गायनातून दुसरे पुष्प गुंफणार आहेत. दुसरा मानाचा पुरस्कार विख्यात तबलावादक डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार जेष्ठ तबलावादक डॉ. संगीता अग्निहोत्री (इंदोर) यांना दि.28 रोजी देण्यात येणार आहे. हा पुरस्कार उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर यांच्याहस्ते व यामिनी जव्हेरी (मुंबई), रुपा सेठना (पाचगणी) यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. या दिवशी सानिका गोरेगांवकर यांचे गायन होणार आहे.

दि. 29 रोजी शाश्वती चैतन्य (पुणे) आणि रेवती कामत (पुणे) यांचे गायन होणार आहे. तर चंद्रशेखर फणसे यांचे सतार वादन होणार आहे. दि. 30 रोजी कस्तुरी दातार-अत्रावलकर (पुणे) व अपर्णा केळकर (पुणे) यांचे गायन होणार आहे. तसेच अमेरिका येथील नाश नॉबर्ट यांचे बासरीवादन होणार आहे. दि. 1 ऑक्टोबर रोजी आसावरी देसाई-देगलुरकर (पुणे) व भाग्येश मराठे (मुंबई) यांचे गायन होणार आहे. उ. रफिक खान व उ. शफिक खान धारवाड यांची सतार जुगलबंदी यादिवशी रंगत आणणार आहे. दि. 2 रोजी सानिका कुलकर्णी (पुणे) व पं. राजेंद्र कंदलगांवकर (पुणे) यांचे गायन तर पं. राजन कुलकर्णी व सारंग कुलकर्णी (पुणे) यांची सरोद जुगलबंदी वादन रंगणार आहे. दि. 3 रोजी हर्षदा जांभेकर (ठाणे) यांचे कथ्थक नृत्य आणि पं. मनिष पिंगळे (मुंबई) यांचे गिटार वादन होणार आहे. तर अतुल खांडेकर (पुणे) व हृषिकेश बोडस (मिरज) यांचे गायन होणार आहे. दि. 4 ऑक्टोबर रोजी संगीत महोत्सवाची प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षेतखाली व उद्योगपती माधव कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सांगता होणार आहे. यावेळी अहमदसाहेब सतारमेकर यांना यावर्षीचा श्री अंबाबाई संगीत सेवा पुरस्कार देण्यात येणार आहे. कौस्तुभ देशपांडे यांच्या आनंत तरंग या मराठी गाण्यांच्या मैफीलीलने महोत्सवाची सांगता होणार आहे. या पत्रकार परिषदेस अध्यक्ष मधुकर पाटील, उपाध्यक्ष शेखर करमरकर उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button