सांगली : बंदी आदेश धुडकावत आटपाडीत भरला जनावरांचा बाजार | पुढारी

सांगली : बंदी आदेश धुडकावत आटपाडीत भरला जनावरांचा बाजार

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथे दर शनिवारी तालुक्याचा भरणारा जनावरांचा बाजार लम्पी चर्मरोग संसर्ग रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आला होता; परंतु हा बंदचा आदेश धुडकावून लावत आटपाडी निंबवडे रस्त्यावर बाजार भरवला गेला. रस्त्यावरच बाजार भरल्याने वाहतुकीची कोंडी झाली. दरम्यान, सांगली जिल्ह्यात लम्पी चर्मरोग संसर्ग रोखण्यासाठी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले होते.

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुक्याचा आठवडा बाजार भरतो. कर्नाटक आणि कोकण तसेच सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व व्यापारी या बाजारात हजेरी लावतात. दर शनिवारी शेळ्या, बोकडे आणि मेंढ्यांची दीड ते दोन कोटी रुपयांची उलाढाल होते.

आज सकाळी बाजार बंद असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन्ही दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच बाजार मांडला. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला वाहने लावली. आणि खरेदी आणि विक्रीचे व्यवहार केले.

आटपाडी निंबवडे रस्त्यावर जनावरांचा बाजार झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शनिवारी सकाळी शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीतून ये -जा करावी लागली. दरम्यान, वाहतुकीची कोंडीची दखल मात्र पोलिसांनी घेतली नाही. महसूल आणि पोलीस यंत्रणा लम्पी चर्मरोग संसर्ग रोखण्यासाठी पुकारलेला आठवडा बाजार बंद रोखण्यात अयशस्वी ठरल्‍याचे  चित्र हाेते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button