राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मंत्रालयामध्ये नोकरी देण्याच्या अमिषापोटी पैसे उकळणार्या टोळीचा भाग असलेला 'सैराट' फेम प्रिन्स उर्फ सूरज पवार हा फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तैनात आहे. यासह आरोपींना गरजवंत मुलांचे मोबाईल क्रमांक पुरविणार्या विजय बाळासाहेब साळे (रा. खडांबे ता. राहुरी) या आरोपीला राहुरी हद्दीतून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. सूरज पवार याचे नाव नोकरीच्या अमिषापोटी पैसे उकळणार्या टोळीत घेतले जात आहे. भेंडा फॅक्टरी (ता.नेवासा) येथील तरूण महेश वाघडक याने चतुराई दाखवित बनावट कागदपत्रांद्वारे मंत्रालयामध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने तरूणांची फसवणूक करणार्या टोळीचा पर्दाफाश केला.
यामध्ये कक्ष अधिकारी अशी बतावणी करणारा दत्तात्रय अरूण क्षीरसागर (रा. मालेगाव, नाशिक) याच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ व्हीआयपी विश्रामगृह ठिकाणीच मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. आरोपी क्षीरसागर याने राहुरी बसस्टँड येथे मागितलेल्या पाच लाखांपैकी उर्वरित 3 लाख रुपये घेण्यासाठी तक्रारदाराला बोलविले होते.
महेश वाघडक याने बनावट कागदपत्रांना पाहून आरोपींचा भांडाफोड केला. त्यानंतर त्याचा संगमनेर येथील साथीदार आकाश विष्णू शिंदे व भारतीय राजमुद्रा तसेच शासकीय शिक्के तयार करून देणारा ओमकार नंदकुमार तरटे असे तिघे जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते. यानंतर आकाश शिंदे यास बेरोजगार तरूणांची माहिती व क्रमांक पुरविणार्या चौथ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विजय साळे (वय 31) या तरूणाच्या अटकेनंतर या प्रकरणात अजून कोणावर कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
बनावट शिक्के तयार करण्यासठी 'सैराट' चित्रपटातील अभिनेता सूरज पवार हा उपस्थित होता. त्यानेच बनावट शिक्के तयार करण्यासाठी शॉर्ट फिल्मचे कारण दिले. त्यावेळी कोणत्या तरी व्यक्तीला फोन लावत त्याचा प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे बोलत असल्याचा बनाव केला होता. त्यामुळे या प्रकरणामध्ये ट्वीस्ट निर्माण झालेला आहे. पोलिस सूरज पवारच्या शोधात आहेत. या प्रकरणात मंत्रालयातील संबंधित अधिकारी व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचीही प्रतिक्रिया पोलिस घेणार आहेत.