सांगली : चांदोली धरणाचे चार दरवाजे उघडले; ३००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु (Video) | पुढारी

सांगली : चांदोली धरणाचे चार दरवाजे उघडले; ३००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु (Video)

शित्तूर-वारूण; पुढारी वृत्तसेवा: चांदोली धरण क्षेत्रात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी चांदोली धरणाचे चारही दरवाजे आज, सोमवारी (दि.८)  दुपारी तीन वाजता उघडण्यात आले आहेत. धरणाच्या दरवाज्यातून १३२५ क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून १६७५ क्युसेक असा एकूण ३००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सध्या वारणा नदीपात्रात सुरू करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून गेल्या चोवीस तासात ६४ मिलिमीटर पावसाची नोंद येथे झाली आहे. या पावसामुळे धरणात ९ हजार ८५१ क्यूसेक पाण्याची आवक सुरु आहे. धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक यामुळे गेल्या २४ तासात धरणाची पाणीपातळी १.३ मीटरने वाढली आहे.

चांदोली धरणातून सुरु असलेल्या ३००० क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. हे पाणी नदीकाठच्या पोटमळीत शिरले असून नदीकाठची भात व ऊस शेती पाण्याखाली गेली आहे. गेल्या चोवीस तासात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६४ मि.मी. इतका तर सकाळी आठ ते चार वाजेपर्यंतच्या आठ तासात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आजअखेर धरण क्षेत्रात १४८७ मि. मी. पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापन यंत्रावर झाली आहे. ३४.४० टिएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या चांदोली धरणाची पाणी पातळी सध्या ६२१.४० मीटरवर पोहोचली आहे. धरणात सध्या ८२१.५३ दलघमी म्हणजे, २९.०१ टिएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण ८४.३३ टक्के इतके भरले आहे. वारणा नदीवरील रेठरे-कोकरुड हा बंधारा पुल दोन दिवसांपूर्वीच पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.

 बंद वीजनिर्मिती प्रकल्प सुरू

धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे बंद असलेली वीजनिर्मिती आता पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. सध्या वीज निर्मिती केंद्रातून १६७५ क्युसेक तर सांडव्यातून १३२५ असा एकूण ३००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हेही वाचलंत का? 

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जर असाच वाढत राहिल्यास धरणातील पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी.
-मिलिंद किटवाडकर (उपविभागीय अभियंता, वारणा पाटबंधारे)

Back to top button