पुणे : तलावाजवळील रस्ता झाला समस्या | पुढारी

पुणे : तलावाजवळील रस्ता झाला समस्या

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : इंदापूर शहरातील भार्गवराम तलावाच्या टाऊनहॉलजवळून उत्तरेकडील तटबंदीला चिकटून होणारा रस्ता जमिनीपासून खोल भागात होत आहे. सदर रस्त्याची उंची वाढवून पुढील काम करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा, आंदोलनाचा इशारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व तहसीलदार यांना दिला आहे.

व्यंकटेशनगर येथील भार्गवराम तलावाच्या उत्तर बाजूस तटबंदीलगत सध्या रस्ताकाम चालू आहे. या तटबंदीला लागून 200 हून अधिक नागरिक राहतात. ज्यांना येण्या-जाण्यासाठी सोईस्कर रस्ता, गटारव्यवस्था नाही तसेच सध्या होत असलेल्या रस्त्याची उंची कमी आहे. जर त्याची उंची वाढवली तर नागरिकांना ये-जा करण्यासाठी सोईस्कर आणि जवळचा रस्ता उपलब्ध होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
तसेच तटबंदीला लागून असलेली मोठी सिमेंट गटार स्वच्छ करून ठिकठिकाणी चेंबर काढून नागरिकांचे सांडपाणी गटारलाइनला जोडून घ्यावी. नवीन होत असलेल्या तळ्यातील 30 फुटी रोडची उंची वाढवून गटार लेव्हलला घ्यावी.

या रस्त्याला चिकटून असलेल्या तटबंदीतून मार्ग काढून द्यावा; जेणेकरून नवीन रस्त्याला ये-जा करायला सोईस्कर होईल.
पाठीमागील बाजूस असलेल्या गटारलाइनला लागून पथदिवे बसवावेत. तसेच सदर ठिकाणी असलेली गटार व संरक्षित भिंत पाडून योग्य उंचीची गटार बांधून द्यावी; जेणेकरून नागरिकांना ये-जा सोईस्कर होणार आहे, असे निवेदन नागरिकांनी मुख्याधिकारी व तहसीलदारांना दिले आहे.

मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा. न झाल्यास येणार्‍या काळात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वसिम बागवान यांनी दिला आहे. या वेळी गणेश पवार, रहिम शेख, विनोद पलंगे, मालन पवार, संगीता शिंदे आदी उपस्थित होते.

Back to top button