एसटी ही आता गॅस, विजेवर धावणार! डिझेलच्या वाढत्या दरामुळे निर्णय
एसटी महामंडळानेही गॅस आणि विजेवर धावणार्या बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे सीएनजी, एलपीजी आणि इलेक्ट्रिकवर चालणार्या गाड्यांना मागणी वाढते आहे. त्याप्रमाणे एसटी महामंडळानेही गॅस आणि विजेवर धावणार्या बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात पाचशे इलेक्ट्रिक बस भाड्याने घेण्यात येणार आहेत.
महापुरामुळे एसटी चे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातच एसटीला 2 कोटी 80 लाख रुपयांचा फटका बसला आहे. जिल्ह्यात 720 बसेस आहेत. वर्षभरापासून एस.टी.ची वाहतूक पूर्ण क्षमतेने होत नाही. दि. 5 मे पासून लॉकडाऊनमुळे सर्वच बस तीन महिने थांबून होत्या. एस.टी.ला राज्यभरातून सुमारे 23 कोटी तर जिल्ह्यातून सुमारे 75 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. ते जवळजवळ निम्म्यावर आले आहे. सध्या कोरोना नियमांचे पालन करीत एस.टी. सेवा तोट्यात चालवावी लागत आहे. मागील लॉकडाऊनच्या कालावधीत एस.टी.कामगारांना त्यांचे वेतन मिळण्यास आलेल्या अडचणी पुन्हा येऊ नयेत यासाठी शासनाने एस.टी. कर्मचार्यांना पुढील 6 महिन्यापर्यंतचे वेतन नियमित व वेळेत मिळण्यासाठी महामंडळास भरीव आर्थिक सहाय्य मिळवून देण्याची मागणी केली आहे. प्रत्येक महिन्याचा पगार देण्यास अडचणी येत आहेत.
याचदरम्यान, पेट्रोल – डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सीएनजी, इलेक्ट्रिक गाड्या घेण्याकडे कल वाढत आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या गाड्या बाजारात आणल्या आहेत. त्याप्रमाणे एस.टी.ने गॅसवरील एलएनजीच्या गाड्या सुरू करण्यासाठी एका कंपनीस गॅस स्टेशन उभारण्यासठी पत्र दिले आहे. त्यानुसार धुळे, अक्कलकोट, इस्लामपूर आणि कागल येथे एलएनजीचे गॅस भरण्याचे केंद्र उभारण्यात येणार आहे. सध्याच्या सुमारे 2 हजार बसच्या इंजिनमध्ये बदल करून एलएनजीला अनुकूल करून घेण्यात येणार आहेत. विजेवर धावणार्या इलेक्ट्रिक बसही सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात पाचशे बस भाड्याने घेण्यात येणार आहेत. रस्ते कर, टोल कर, उच्चदाबाची विद्युत वाहिनी आगारापर्यंत आणणे आणि इतर खर्च हा महामंडळाने करण्याचा आहे. बस, चार्जर मालकी बस पुरवठादाराची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एसटी महामंडळाच्या खर्चात बचत होणार ः वाघाटे
वीज आणि गॅसमुळे एसटीच्या खर्चात बचत होणार आहे. अडचणी कमी होतील. कर्मचार्यांचे पगार वेळेवर होतील. बसचे चार्जिंग करण्यासाठी औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. औरंगाबाद विभागात 389, पुणे 512, मुंबई 369, नागपूर 353, नागपूर 217 आणि अमरावती विभागात 160 इलेक्ट्रिक बस देण्यात येणार आहेत, अशी माहिती एस.टी. सांगली विभागाचे वाहतूक नियंत्रक अरुण वाघाटे यांनी दिली.