सांगली : तासगावमध्ये तलवारीने वार करून एकाचा खून | पुढारी

सांगली : तासगावमध्ये तलवारीने वार करून एकाचा खून

तासगाव पुढारी वृत्तसेवा : येथे दोन गटांत सुरू असलेल्या वादातून जोरदार मारामारी झाली. त्यानंतर काही वेळाने एकावर तलवारीने वार करून खून केल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. अनिल जाधव (वय 50) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत तासगाव पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी, ढवळवेश परिसरातील तरुणांच्या दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये जास्त वाढ झाली होती. त्यातून गुरुवारी दुपारी दोन गटांत वाद उफाळून आला. यावेळी जोरदार मारामारी झाली. त्यानंतर काहींनी मध्यस्थी करून तो वाद मिटविला. पाऊस सुरू झाल्याने सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. मात्र काही वेळाने अनिल जाधव हे रस्त्यावर येऊन थांबले होते. ही संधी साधून दुसर्‍या गटाच्या एकाने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला.

तलवारीचा घाव वर्मी बसल्याने अनिल हे रस्त्यावर कोसळले. त्यानंतर संशयित व सोबत असलेले अन्य साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. अनिल यांना तातडीने येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजिव झाडे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. अनिल जाधव हे शहर आणि परिसरात प्रसिद्ध असणार्‍या शिवनेरी मंडळाचे प्रमुख होते.

हेही वाचा

Back to top button