अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले याच्यावर आरोपपत्र दाखल | पुढारी

अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले याच्यावर आरोपपत्र दाखल

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले आणि अन्य दोघांविरोधात गेल्यावर्षी सुरू केलेल्या जमीन बळकावण्याच्या चौकशीसंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तब्बल 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे भोसले यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

ईडीने 2016 मध्ये पुण्यात दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्याच्या आधारे भोसले यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात पुण्यातील भूखंड रणजित मोहिते यांनी एआरए मालमत्तांमध्ये हस्तांतरित केला होता. ही जमीन केवळ सरकारला हस्तांतरित केली जाऊ शकते अशा अटींचे उल्लंघन करण्यात आले होते.

ईडीने मनी लाँड्रिंगच्या तपासादरम्यान, विविध ठिकाणी शोध आणि जप्तीची कारवाई करण्यात आली आणि दोषी कागदपत्रे जप्त करण्यात आली. यात ईडीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या प्रकरणाशी संबंधित 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. बाजार भावानुसार याची किंमत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. यात अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एबीआयएल) आणि त्यांच्या इतर समूह कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये आहेत.

ईडीने या तपासादरम्यान अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांची वेळोवेळी चौकशी केली होती. त्यानंतर आता अमित भोसले यांच्यावर पीएमएलए कायद्याच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, येस बँक-डीएचएफएल प्रकरणात सीबीआय आणि ईडीने अटक केल्यानंतर अविनाश भोसले हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Back to top button