शिराळ्यातील पारंपरिक नागपंचमी उत्साहात साजरी | पुढारी

शिराळ्यातील पारंपरिक नागपंचमी उत्साहात साजरी

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : शेकडो वर्षाची परपंरा असणारी शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सव न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. यावेळी रिमझिम पावसाने देखील उत्सवात हजेरी लावली होती. मागील दोन वर्षे कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला नाही. यंदा मात्र विनानिर्बंध नागपंचमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करता आला.

पहाटे पाच पासून भाविकांनी ग्रामदैवत अंबामाता दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अनेक वर्षांपासून जिवंत नागाच्या पुजेची परपंरा जोपासणा-या शिराळकरांनी कायद्याचे पालन करत जिवंत नागा ऐवजी नाग प्रतिमेचे व घरोघरी मातीच्या नागाची पुजा करून नागपंचमी साजरी केली. कायद्याचे उल्लघन होवू नये यासाठी दोन दिवसांपासूनच पोलीस व वन यंत्रणा सज्ज होती.

सकाळी ६० नागमंडळे, कार्यकर्ते विविध वाद्यांच्या ताफ्यासह प्रतिकात्मक नाग देवतेची प्रतिमा घेऊन आंबा माता मंदिरात पोहोचले. त्या ठिकाणी पूजा झाल्या नंतर अंबामातेच्या दर्शना नंतर शिराळ्यातील घराघरातून गृहिणींनी भक्तिभावाने मातीच्या नागाची, लाह्या, दुर्वा, कापसाचे वस्त्र आदी साहित्यासह पूजा केली.

शिराळाची जगप्रसिद्ध नागपंचमी 2002 पासून कायद्याच्या बंधनात अडकली आहे. त्यामुळे शिराळकरांच्या बरोबर भाविकांचा नागपंचमी हा उत्सव कायद्याच्या अंमलबजावणीनुसार सुरू आहे. दुपारी 12 वाजणेच्या सुमारास नाग पंचमीचा गाभा असणाऱ्या पांडुरंग व प्रमोद महाजनांच्या घरात मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. या वेळी मानकरी कोतवाल, डवरी, भोईआदी मानकरी उपस्थित होते. या वेळी मानाच्या नागराज याचा मुखवटा आणि मानाचे सराफ यांनी दिलेल्या नाग प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नाग प्रतिमेच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला.

पुर्वी जिवंत नागाची मिरवणूक काढली जायची, परंतु न्यायालयीन निर्बंध असल्यामुळे प्रतिकात्मक नागाची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक नायकूडपूरा येथून गुरूवार पेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठ आंबामाता रोड मार्गे काढण्यात आली. नाग मंडळाचे कार्यकर्ते व तरुणाई विविध वाद्यांच्या तालावर मिरवणुकीसमोर नाचत होते. मिरवणुकीच्या वेळी प्रत्येक नागमंडळाच्या गाड्या बरोबर पोलीस अधिकारी, वनविभागाचे कर्मचारी यांचा फौंजफाटा होता.

नागपंचमी उत्सव शांततेत व कायद्यानुसार व्हावा व कायद्याचा भंग करणा-यांवरती वॉच ठेवण्यासाठी गेली दोन दिवसापासूनच महसूल, वन विभाग व पोलिस पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यालयाच्या आदेशाचे पालन न करणा-यावरती कडक कारवाई करण्यासाठी पोलिस, वनविभाग, महसूल विभागाने अनेक ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावले होते.

यावेळी उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने 125 अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये सहाय्यक वनसंरक्षक 04, वनक्षेत्रपाल 16, वनरक्षक 50, वनमजुर 54 यांचा समावेश होता. तसेच 10 गस्ती पथके आणि 7 तपासणी नाक्यांद्वारे 60 नागराज मंडळावर देखरेख ठेवण्यासाठी होती.

शिराळा प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसिलदार गणेश शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गटविकास अधिकारी संतोष राऊत, माजी नगराध्यक्षा प्रतिभा पवार, सुनीता निकम, सुनंदा सोनटक्के, माजी उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, विजयकुमार दळवी आदींसह सर्व नगरसेवकांनी यात्रेची पहाणी केली.

Back to top button