

विटा; पुढारी वृत्तसेवा : खानापूर पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीत एकूण आठ पैकी एक अनुसुचित जाती महिला तर दोन ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण पडले आहे. तसेच दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर तीन जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. यावेळी निवडणूक निरिक्षक म्हणून उपजिल्हाधिकारी सचिन बार्वेकर उपस्थित होते. तसेच तहसिलदार ऋषिकेत शेळके यांनी आरक्षण सोडतीची कार्यवाही पार पाडली.
खानापूर तालुका पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत गुरूवारी महसूल भवनाच्या सभागृहात झाली. लेंगरे गण अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी तर पारे आणि आळसंद गण ओबीसीसाठी राखीव झाले. करंजे आणि भाळवणी सर्वसाधारण महिला तर नागेवाडी, गार्डी आणि बलवडी (खा.) पंचायत समिती गण सर्वसाधारण खुले झाले. यामुळे काही ठिकाणी इच्छुकांना आरक्षणाचा फटका बसला आहे, तर काही ठिकाणी खुल्या आरक्षणाने इच्छुकांच्यातील स्पर्धा वाढणार आहे.
सुरूवातीला तहसिलदार शेळके यांनी आरक्षण काढण्याबाबतची माहिती दिली. सन २००२, २००७, २०१२ आणि २०१७ अशा गेल्या चार निवडणूकांचे आरक्षण गृहित धरून चक्रानुक्रमे आरक्षण काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनुसुचित जातीसाठी तालुक्यात आठपैकी एक जागा निश्चित आहे. गतवेळी अनुसुचित जातीची जागा सर्वसाधारण असल्याने यावेळी महिलांसाठी राखिव होणार असल्याचे त्यांनी सुचित केले. त्यानंतर लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने लेंगरे पंचायत समिती गण अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याचे घोषित करण्यात आले. ओबीसीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आठपैकी दोन जागा राखीव असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी एक गण महिलांसाठी राखीव असणार आहे. त्यासाठी चक्रानुक्रमे पारे आणि आळसंद गण निश्चित झाले. यापैकी एक गण महिलांसाठी आरक्षित करायचा असल्याने त्यासाठी समृद्धी या लहान मुलीच्या हस्ते चिट्ठी काढण्यात आली. यामध्ये आळसंद पंचायत समिती गण नागरीकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी महिलांसाठी राखिव झाला. तर पारे पंचायत समिती गणात ओबीसी सर्वसाधारण आरक्षण राहिले. उर्वरीत पाचपैकी दोन महिला सर्वसाधारण गणांसाठी चक्रानुक्रमे करंजे आणि भाळवणी पंचायत समिती गण निश्चित करण्यात आले. नागेवाडी, गार्डी आणि बलवडी (खा.) हे गण सर्वसाधारण खुले असल्याचे तहसिलदार शेळके यांनी जाहीर केले.
यावेळी गटविकास अधिकारी संदीप पवार, संदीप मुळीक, माजी जिल्हा परिषद सदस्य किसन जानकर, फिरोज शेख, हिम्मत जाधव, संग्राम माने, सौरभ बाबर, संतोष काटकर, महावीर शिंदे, किरण कचरे, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, माजी सभापती चंद्रकांत जाधव, भक्तराज ठिगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :