सांगली : कृष्णाकाठी मृत माशांचा खच! रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा अंदाज… | पुढारी

सांगली : कृष्णाकाठी मृत माशांचा खच! रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा अंदाज...

पलूस : पुढारी वृत्तसेवा : नागठाणे ते आमणापूर कृष्णा नदीच्या पात्रालगत आज सकाळपासून लाखो मृत माशांचा खच पडला आहे. ही २०१९ ची पुनरावृत्ती असून माशांची पाण्यावर न पाहावणारी तडफड आहे. नदीपात्रात रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता सोडल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासून माशांचा मृत्यू झाला आहे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवणे गरजेचे आहे.

नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नदीतून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत आहे. याचाच लाभ उठवित कुणीतरी कारखान्यातील रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता तसेच सोडून दिले आहे, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हे पाणी नदीत सर्वत्र पसरल्यानंतर लाखो मासे आणि खेकडे मृत्यूमुखी पडले आहेत. नदीकाठी मृत माशांचा आणि खेकडय़ांचा खच पडला असून तीव्र दुर्गंधी पसरली आहे. कृष्णा नदीकाठी असलेल्या पलूस तालुक्यातील नागठाणे, आमणापूर, भिलवडी घाटापर्यंत सर्वत्र या मृत माशांचे ढीग आढळत आहेत. मृत मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

कृष्णा नदीच्या पात्रालगत आज पाहणी केली असता हजारो मासे मृत झाल्याचे चित्र दिसत आहे. हे मृत मासे खाल्ल्याने मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तरी सर्व नागरिकांनी वाढत्या पाण्याचा धोका ओळखून नदीकाठी जाऊ नये. मृत मासे गोळा करू नयेत तसेच सतर्क राहावे.
 तहसीलदार, निवास ढाणे

 

हेही वाचा :

Back to top button