

सांगली; पुढारी वृत्तसेवा : इंधन समायोजनच्या नावाखाली महावितरणने मनमानी वीज दरवाढ करून ग्राहकांवर नाहक बोजा टाकला आहे. महावितरण स्वत:ची वीज गळती व चोरी लपविण्यासाठी वारंवार दरवाढीचा वरंवटा फिरवित असल्याने ग्राहकांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. वीज ग्राहक संघटनांनी याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
इंधन समायोजन म्हणजे वीज खरेदीसाठी होणारा खर्च. उन्हाळ्यात जादा वीज वापर झाल्याचे कारण पुढे करीत महावितरणने इंधन समायोजन करात प्रचंड वाढ केली आहे. या वाढीनुसार सरासरी प्रत्येक वर्गवारीचे प्रतियुनिट एक रुपया बिल वाढणार आहे. उच्च दाबाच्या औद्योगिक ग्राहकांना प्रतियुनिट 1 रुपया 35 पैसे बोजा सहन करावा लागेल. लघु दाबाच्या 20 हॉर्स पॉवरपर्यंत वीज वापरणार्यांना कारखानदारांना एक रुपया, यापेक्षा जादा वीज वापर असणार्यांना 1.20 पैसे प्रतियुनिट जादा वीज बिल येणार आहे.
तसेच 100 युनिट वीज वापरणार्या घरगुती ग्राहकांना 0.65 पैसे, 101 ते 300 युनिट वीज वापरणार्या घरगुती ग्राहकांना 1 रु. 45 पैसे, 300 ते 500 युनिट वीज वापरणार्या घरगुती ग्राहकांना 2 रु. 5 पैसे प्रतियुनिटसाठी जादा मोजावे लागणार आहेत. तर 20 हॉर्स पॉवरपेक्षा कमी वीज वापरणार्या कमर्शियल वीज वापरकर्त्यांना 1 रुपया 40 पैसे, 20 ते 50 हॉर्स पॉवर वीज वापर होणार्यांना 2 रु. 45 पैसे तर उच्च दाब कनेक्शन असणार्या ग्राहकांना 2 रु. 20 पैसे जादा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या वाढीने राज्यात 2.75 कोटी ग्राहकांवर दरमहा एक हजार कोटींचा भुर्दंड बसणार आहे. पुढील पाच महिन्यांत सुमारे पाच ते साडेपाच हजार कोटी रुपये महावितरण ग्राहकांकडे वसूल करणार आहे. यामुळे सर्व ग्राहकांच्या महिन्याच्या वीज बिलात मोठी वाढ होणार आहे. विश्वासात न घेता ही वाढ केल्याने ग्राहकांत संतापाची लाट आहे. याविरोधात वीज नियामक आयोगाकडे दाद मागता येणार नसल्याने अनेक ग्राहक संघटनांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.