मंचर: शिंगवे, मेंगडेवाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा मृत्यू | पुढारी

मंचर: शिंगवे, मेंगडेवाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा मृत्यू

मंचर, पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यातील शिंगवे आणि मेंगडेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एकूण तीन शेळ्या ठार झाल्या आहे. त्यामुळे संबधित शेतकऱ्यांचे २२ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. शिंगवे येथील गाढवे मळ्यात शेतकरी गेनभाऊ राघू गाढवे यांच्या घराबाहेर बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात गाढवे यांच्या पूर्ण वाढ झालेल्या दोन शेळ्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच मेंगडेवाडी येथे माजी सरपंच भरत फल्ले यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करत असलेल्या संतोष शिर्के यांच्या शेळीवर देखील बिबट्याने हल्ला करत तिला ठार केले. यामध्ये शिर्के यांचे ६ ते ७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान या घटनेची माहिती कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. शिंगवे परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून या परिसरात ऊस क्षेत्र जास्त असल्यामुळे दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत आहे. पहाटेच्या वेळी मोकळ्या हवेत फिरण्यासाठी निघालेल्या अनेक नागरिकांना बिबट्याबरोबर तरसासारखा प्राणी दर्शन देत आहे. त्यामुळे बिबट्या बरोबर आता तरस या प्राण्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहे.

Back to top button