मिरज : पुढारी वृत्तसेवा : 'वॉन्लेस रुग्णालयाच्या मदतीसाठी होणार इंग्लंडमध्ये क्रिकेटचा सामना' या मथळ्याखाली दैनिक 'पुढारी'ने आज (दि.१४) प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचे इंग्लंडमध्ये असणार्या क्रिकेट आयोजकांकडून मंगळवारी वाचन करण्यात आले. दैनिक 'पुढारी'च्या (Pudhari) या विशेष वृत्तामुळे असे कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया इंग्लंडस्थित युके वॉन्लेस फौंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कवठेकर यांनी व्यक्त केली. याबाबत त्यांनी दैनिक 'पुढारी'ला व्हॉट्स अॅप कॉलिंग करून प्रतिक्रिया दिली.
मिरजेतील वॉन्लेस रूग्णालयाच्या मदतीसाठी भारत विरूद्ध इंग्लंडमधील कौंटी संघ लिस्टेशायर या दोन देशांमध्ये क्रिकेटचा सामना होणार आहे. २५ जून रोजी इंग्लंडमध्ये हा सामना रंगणार आहे. सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणार्या आणि मिरजेतील वॉन्लेस रूग्णालयाच्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी हा पुढाकार घेतला आहे. याबाबतचे विशेष वृत्त मंगळवारी ( दि. १४) दैनिक 'पुढारी'ने (Pudhari) प्रसिद्ध केले.
दैनिक 'पुढारी'चा आजचा ई पेपर इंग्लंडमधील क्रिकेटचे आयोजन करणार्या संयोजकांनी वाचला. या वृत्ताची प्रिंट काढून त्याचे संयोजकांमध्ये सामुदायिक वाचन करण्यात आले. याबाबत युके वॉन्लेस फौंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत कवठेकर यांनी दैनिक 'पुढारी'ला फोन करून धन्यवाद दिले. आम्ही करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्याला ठळक प्रसिद्धी दिल्याबद्दल दैनिक 'पुढारी'चे अभिनंदन केले.
कवठेकर म्हणाले, वॉन्लेस रूग्णालयाच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन इंग्लंडमध्ये स्थायिक झालो आहोत. २००४ मध्ये डॉ. शिरीष पारगावकर यांनी युके वॉन्लेस फौंडेशनची स्थापना केली. मिरजेत शिक्षण घेऊन इंग्लंडमध्ये स्थायिक झालेली अशी सुमारे १५० कुटुंबे आहेत. रूग्णालय व मिरजेच्या बाबतीत एक उत्तरदायित्व म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येऊन या क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. २५ रोजी या क्रिकेटच्या स्पर्धा होतील. शिवाय ९ जुलैरोजी वर्धापन दिन साजरा करणार आहोत. त्यातून मिळणारा निधी रूग्णालयासाठी देणार आहोत.
फौंडेशनचे दिनकर मोरे, मायकल देवकुळे, संजय सातपुते, प्रवीण होळकर, प्रवीण अही, प्रवीण थॉमस, नितिन शिंदे, अतुल व्यंकटेश, नितीन दाभाडे हे पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घेत आहेत. आम्ही आयोजित केलेली स्पर्धा उत्साहात होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात निधी जमा होऊन त्याचा फायदा वॉन्लेस रूग्णालयाच्या माध्यमातून गरजू रूग्णांना होणार आहे. आमच्या या कार्याची दखल घेऊन दैनिक 'पुढारी'ने विशेष वृत्त प्रसिद्ध केले. ते वृत्त आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून 'ई पुढारी' च्या वेबसाईटवर वाचले. त्या वृत्ताचे वाचन आम्ही सामुदायिकरित्या केले. अशा वृत्तामुळे आम्ही करीत असलेल्या कार्याला चांगले प्रोत्साहन मिळाले आहे. इंग्लंडमधील अनेकजण पुढे येऊन रूग्णालयाला मदत करणार आहेत, असेही ते म्हणाले.
हेही वाचलंत का ?