Vita Municipal Council : विटा नगरपरिषद आरक्षण सोडत ; १३ पैकी ४ प्रभाग राखीव | पुढारी

Vita Municipal Council : विटा नगरपरिषद आरक्षण सोडत ; १३ पैकी ४ प्रभाग राखीव

विटा : पुढारी वृत्तसेवा : विटा नगरपरिषदेच्या (Vita Municipal Council)  आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण सोडतीत प्रभाग ५, ९, ११ आणि १२ हे अनुसुचित जातीसाठी राखीव झाले. उर्वरीत सर्व प्रभागात प्रत्येकी एक महिला आणि एक सर्वसाधारण खुला अशा प्रकारे आरक्षण पडले आहे.

(Vita Municipal Council) ओबीसींच्या आरक्षणाविना पालिका निवडणुकांचे रणांगण रंगू लागले आहे. गेल्या महिन्यात प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता आरक्षण सोडतीकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. विटा पालिकेसाठी तेरा प्रभागांचा नवीन अंतिम आराखडा मंजूर झाला. आज सोमवारी सकाळी पालिकेच्या अल्पबचत सभागृहात आरक्षण सोडत पार पडली. प्रांताधिकारी संतोष भोर, मुख्याधिकारी मनोजकुमार पांढरे, अतिरिक्त मुख्याधिकारी स्वप्निल खामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, किरण तारळेकर, अजित गायकवाड, अनिल बाबर, शिवसेना शहरप्रमुख राजू जाधव, रामचंद्र भिंगारदेवे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अविनाश चोथे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सुरूवातीलाच लोकसंख्येच्या प्रमाणात शहरातील १३ पैकी ४ प्रभाग अनुसुचित जातीसाठी राखीव करण्यात आल्याचे प्रांताधिकारी भोर यांनी जाहीर केले. त्यानुसार प्रभाग ५, ९, ११ आणि १२ अनुसुचित जातीसाठी राखीव झाले. त्यानंतर यापैकी २ प्रभाग महिलांचे असल्याने त्यासाठी चिठ्ठी काढून सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रभाग ९ आणि ११ अनुसुचित जाती महिलासाठी राखीव झाले. या प्रभागातील दुसरी जागा सर्वसाधारण असणार आहे. तर प्रभाग ५ आणि १२मध्ये अनुसुचित जाती असल्याने दुसरी जागा सर्वसाधारण महिला असणार आहे, असे प्रांताधिकारी भोर यांनी जाहीर केले.

दरम्यान, संजय भिंगारदेवे, प्रशांत कांबळे, राहुल कांबळे, अतुल कांबळे, भरत कांबळे यांच्यासह इच्छुकांनी प्रभाग ९ आणि ११ मधून निवडणुकीची तयारी केली होती. त्यांना आता प्रभाग ५ आणि १२ मधून निवडणूक लढावी लागणार आहे. प्रभाग ५ आणि १२ मधून यापूर्वी इच्छुक असणाऱ्या लोकांशी त्यांची स्पर्धा असणार आहे.

उर्वरीत सर्व प्रभागात प्रत्येकी एक महिला आणि एक सर्वसाधारण नगरसेवक निवडून येणार आहे. आता आरक्षण सोडत झाल्यामुळे इच्छुकांना तयारीसाठी अवधी मिळणार आहे. सोडतीसाठी प्रभागातून तयारी करणाऱ्या इच्छुकांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. विनोद पाटील, संग्राम माने, प्रशांत कांबळे, समीर कदम, मनसे तालुकाप्रमुख साजिद आगा, माजी नगरसेवक सुमित कदम, ॲड. धर्मेश पाटील, अभिजित पाटील, गजानन कदम, ॲड. विजय जाधव, ॲड. तानाजी जाधव, शिवाजी हारूगडे, प्रसाद लिपारे, माजी नगरसेवक पद्मसिंह पाटील आदीसह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button