फडणवीस यांचा करिष्मा यापुढे महाराष्ट्रभर चालणार :आ. महेश लांडगे | पुढारी

फडणवीस यांचा करिष्मा यापुढे महाराष्ट्रभर चालणार :आ. महेश लांडगे

पिंपरी : राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी विरोधकांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेरच्या टप्प्यात निवडणूक जिंकली. फडणवीस यांचा हा करिष्मा यापुढील काळात महाराष्ट्रभर चालणार आहे, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष आ. महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केले. आमदार लांडगे म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीचे अचूक नियोजन केले. मतदानापूर्वीच फडणवीस चमत्कार करणार हे निश्चित होते. संख्याबळ नसतानाही फडणवीस यांनी सहावी जागा लढवण्याची जोखीम पत्करली आणि ती यशस्वी करुन दाखवली.

विधान सभेतील अन्य पक्षांतील आमदारांचाही फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, ही बाब आता अधोरेखित झाली आहे. राज्यसभेतील विजयाचा हा सिलसिला विधान परिषद आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे दिसणार आहे, असेही आ. लांडगे यांनी म्हटले आहे. आ. लक्ष्मण जगताप आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून प्रवास करीत मतदानासाठी विधान भवनात दाखल झाले. पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांनीही आजारपणात पक्षाशी असलेली बांधिलकी कृतीतून दाखवून दिली,असेही आमदार लांडगे म्हणाले.

Back to top button