नगर : भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला | पुढारी

नगर : भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

 

जवळा जिल्हा परिषद गटामध्ये जवळा, नान्नज व परिसरातील वाड्यांवर जिल्हा परिषद गटाचे गणिते आवलंबून असायची; परंतु नान्नज व परिसरातील वाड्या खर्डा गटात गेल्याने जवळा गटाची व खर्डा गटाचे देखील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. साकत गट हा नवीन झाल्यामुळे खर्डा गटातील गावे साकत गटात गेल्याने गट-गणाच्या रचनेने काही खुशी कही गम, अशी परिस्थिती नेत्यांची झाली. या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप व विरोधात राष्ट्रवादी आमने-सामने येणार आहेत. आमदार रोहित पवार यांची पहिलीच जिल्हा परिषद निवडणूक असल्याने त्यांचा कस जिल्हा परिषद व पंचायत संमितीच्या निवडणुकीत लागणार आहे, तर माजी मंत्री राम शिंदे यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला होणार का? हेही पाहणे औत्स्ाुक्याचे ठरणार.

त्यामुळे जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट, तर दोन गण वाढले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्हा परिषद दोन गटा ऐवजी तीन गट होणार आहेत. सन 2016 मध्ये जामखेडला ग्रामपंचायत ऐवजी नगरपरिषद झाल्याने तालुक्यातील जिल्हा परिषदेचा तीन गटापैकी एक गट कमी झाला होता.
त्यामुळे जामखेड गट वगळता उर्वरित जवळा व खर्डा गट, असे दोन गट राहिले होते. सद्यस्थितीला जवळा व खर्डा दोन्ही गट आरक्षित होते. जवळा जिल्हा परिषद गटात सदस्य म्हणून सोमनाथ पाचारणे व खर्डा गटामध्ये वंदना लोखंडे, असे दोन सदस्य निवडणून आले होते. या दोन्ही गटांत भाजपचे वर्चस्व होते, तर पंचायत समितीचे चार सदस्य भाजपचे निवडून आले होते. यामध्ये जवळा गणातून आरक्षित जागेवर सुभाष आव्हाड, हळगाव गणातून सूर्यकांत मोरे, खर्डा गणातून मनीषा सुरवसे, साकत गणातून डॉ. भगवान मुरूमकर भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. सुरुवातीला अडीच वर्षे सभापती सुभाष आव्हाड होते, तर नंतरच्या अडीच वर्षांत राजश्री मोरे सभापती होत्या

‘माधव’ पॅटर्न कुणाच्या पथ्यावर

तीन ही गटात माळी, धनगर, वंजारी समाज जास्त असल्याने हा ‘माधव’ पॅटर्न सुरू आहे. गेल्या पंचवीस वर्षे हा पॅटर्न भाजप सोबत होता; परंतु या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘माधव’ पॅटर्न कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..

Back to top button