कोपरगावचा नवा गट आ.काळेंच्या पथ्यावर? | पुढारी

कोपरगावचा नवा गट आ.काळेंच्या पथ्यावर?

कोपरगाव :

यापूर्वी कोपरगाव तालुक्यात 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गण होते. यापैकी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी होऊन पाचही गटात आघाडीचे उमेदवार निवडून आले होते. यापैकी 4 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते तर राजेश परजणे हे एकमेव काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडून निवडून आले होते. या निवडणुकीत कोल्हे गटाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

पंचायत समितीच्या 10 गणांपैकी 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, 2 जागांवर परजणे गट तर शिवसेना व भाजपाला 1 जागा मिळाली होती. पंचायत समितीमध्ये आघाडी होऊन सभापती, उपसभापती हे राष्ट्रवादीचे झाले होते. पर्यायाने पाचही वर्षे पंचायत समितीची सत्ता आ. काळे गटाकडे होती. नवीन तयार झालेला प्रारुप आराखड्याचे अवलोकन केल्यास कोल्हे गटासाठी केवळ शिंगणापूर गट फायद्याचा आहे. या गटात त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे, मात्र सन 2016 च्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आ. आशुतोष काळे यांनी त्यावेळी ग्रामीण भाग पिंजून काढत पाचही गटात स्पष्ट बहुमत मिळविले होते.

इको-सेन्सिटिव्ह झोन : संरक्षित वने, पार्कचा १ किमी परीघ पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून अडीच वर्षात ग्रामीण भागात केलेल्या विकास कामांच्या जोरावर सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निसटता विजय देखील मिळविला. योगायोगाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. कोरोनाच्या संकटाचा यशस्वी मुकाबला करून मतदार संघातील प्रत्येक गावात झालेली विकास कामे त्यांना पुन्हा जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत यश मिळवून देवून शकतात.

दरम्यान, नवीन आराखड्यानुसार जी गावे नव्याने या गटातून त्या गटात गेली असली तरी पोहेगाव आणि चांदेकसारे गटाने त्यांना शेवटच्या क्षणी विधानसभा निवडणुकीत निर्णायक आघाडी दिल्यामुळे त्यांना काठावर का होईना विजय मिळवून दिला आहे, हे विसरून चालता येणार नाही. त्यामुळे नव्याने झालेले गट,गण रचना राष्ट्रवादीसाठी सध्या तरी प्रतिकूल दिसत आहे.

गोपीनाथ मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्यासारखे : हभप रामराव महाराज ढोक

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मागील पंच वार्षिक निवडणुकीत काळे गटाला जे निर्भेळ यश मिळाले ते यश आजपर्यंत कधीही मिळालेले नाही. झालेल्या गट- गणाच्या नवीन आराखड्यानुसार आपली सत्ता अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हन काळे गटासमोर उभे ठाकले आहे. याउलट मागील पंच वार्षिक निवडणुकीत झालेला पराभवाचा वचपा काढण्यास कोल्हे गट देखील कोणतीही कसूर ठेवणार नाही.त्यामुळे आज जरी कुणालाही नवीन गट- गण रचना सोईची वाटत असली तरी भविष्यात काय घडू शकते, हे आजमितीला सांगणे अवघड आहे.

राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक ही काळे आणि कोल्हे या पारंपरिक विरोधी गटात होते. अपवादात्मक संवत्सर आणि पोहेगाव गटात तिरंगी लढत होवू शकते. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते आणि प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे आणि गुद्दे देखील वेगळे असतात. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही उमेदवार कोण आहे, त्याचा जनसंपर्क किती आहे व त्या उमेदवाराचे नातेगोते त्या गटात आणि गणात काय भूमिका घेते.

अशा अनेक गोष्टी देखील निर्णायक भूमिका बजावतात. त्यामुळे भविष्यात जि. प. व पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणात नेमकं कोण बाजी मारेल, हे येणारा काळच ठरवणार आहे. सध्या तरी संपूर्ण कोपरगाव तालुक्याचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे. ईच्छुकांनी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून जय्यत तयारी सुरु केली आहे, हे नव्याने सांगायला नको, एवढेच..!

Back to top button