सांगली : लाच घेताना दोघांना अटक, ‘लाचलुचपत’ची कारवाई

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील प्रशासकीय इमारतीमध्ये असणाऱ्या लेखापरीक्षक कार्यालय येथे वर्ग २ आणि वर्ग ३ च्या अधिकाऱ्यांना पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
या प्रकरणातील संशयीत आरोपींची नावे बाबासो महादेव जाधव (वय ३८, पद-लेखाधिकारी, रा. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) व बबन रामचंद्र कोळी (वय ५७, पद-कनिष्ठ लेखापरिक्षक, लेखाधिकारी लेखा परिक्षण पथक, शिक्षण विभाग सांगली, रा. इनामधामणी) अशी आहेत. जाधव हे वर्ग २ आणि कोळी हे वर्ग ३ चे अधिकारी आहेत.
तक्रारदार यांची निवडश्रेणी पडताळणी स्टॅम्पीग, तर त्यांचे सहकारी मित्र यांची वरिष्ठ वेतनश्रेणी पडताळणी व स्टॅम्पीग करुन देण्यासाठीचा अर्ज लेखाधिकारी कार्यालय, सांगली येथे जमा केलेला होता.
अधिक वाचा :
- शेतजमीन खरेदी फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांची आत्महत्या : दोघांवर गुन्हा
- चित्रा वाघ संजय राऊतांवर भडकल्या! खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं?
- राज्यांना ओबीसी लिस्ट बनविण्याचा अधिकार देणारे घटनादुरुस्ती विधेयक सादर
या कार्यालयातील लेखाधिकारी बाबासो जाधव व कनिष्ठ लिपीक बबन कोळी, यांनी त्यांच्यांकडे निवडश्रेणी व वेतनश्रेणीचे काम पुर्ण करुन देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणाची तक्रार दि. ५ ऑगस्टला २०२१ देण्यात आली.
दरम्यान, तक्रारीनुसार ५ ऑगस्टला ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये कनिष्ठ लेखापरिक्षक कोळी, यांनी निवड श्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी पडताळणी व स्टॅम्पींग करुन देण्याकरीता पाच हजार रुपये घेऊन येण्यास सांगीतल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने विजयनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील लेखाधिकारी लेखापरिक्षण पथक शिक्षण विभाग येथे सापळा लावला.
लेखाधिकारी लेखापरिक्षण पथक शिक्षण विभागचे बाबासो जाधव व कनिष्ठ लेखापरिक्षक बबन कोळी यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. ठरल्याप्रमाणे तक्रादारांनी पाच हजार रुपयांची रक्कम दोन्ही संशयीतांकडे सुपुर्द केली. यावेळी संशयीत आरोपींना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले.
लाच घेणा-या दोघा संशयीतांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.