सांगली : खानापूर तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह पाऊस | पुढारी

सांगली : खानापूर तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह पाऊस

विटा : पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यात आज गुरूवारी मान्सून पूर्व वळवाचा पाऊस झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस सुमारे तासभर पडला. हा पाऊस ऊस पिकाला पोषक आहे. शिवाय रानभाज्या विशेषत: भाजीपाला आणि वांगी, दोडका, टोमॅटो इत्यादी फळभाज्यांनाही पूरक असा आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिवसा प्रचंड उष्मा आणि रात्रीच्या वेळी ढगाळ वातावरण असे वातावरण होते. यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. दरम्यान, खानापूर तालुक्यात आज सायंकाळी पाचच्या सुमारास मोठा पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना काही अंशी उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तब्बल तासभर झालेल्या पावसाने विटा शहरात भरलेल्या बाजाराची दाणादाण उडाली. विट्याचा आज बाजार असल्याने बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती.

वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सर्व ठिकाणी पाणीचपाणी झाले. तालुक्याच्या पूर्वेकडून आलेला हा पाऊस तालुक्यातील गार्डी, माहुली, लेंगरे, साळशिंगे, भांबर्डे, रेणावी, रेवणगाव, खानापूरसह घाटमाथ्यावरील करंजे, सुलतानगादे, बेणापूर अशा सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात झाला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button