

माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांचे स्वप्न असलेल्या योगेवाडी - मणेराजुरी 'एमआयडीसी' साठी बिगरशेती वाटपाच्या ०.४६५९ द.ल.घ.मी. पाण्याची मंजूरी जुलै महिन्यात मिळाली. शुक्रवारी (दि. ९) रोजी एमआयडीसी उभारणीसाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. निधीतून एमआयडीसी मध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी दिली आहे. लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले.
रोहित पाटील म्हणाले, १९९७ साली आमदार पतंगराव कदम आणि आमदार आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नातून 'अलकुड - मणेराजुरी एमआयडीसी'ला मंजूरी मिळाली होती. तासगाव तालुक्यातील योगेवाडी, गव्हाण, मणेराजुरी तर कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एम, हरोली, बोरगाव आणि मळणगाव अशा सात गावातील १ हजार ४९५ हेक्टर क्षेत्रावर सदर एमआयडीसी प्रस्तावित होती. ११ वर्षांनंतर २००८ ला एमआयडीसी उभारणी प्रक्रियेला वेग आला. भूसंपादनाची प्रक्रिया सुरु होण्याच्या मार्गावर होती.अचानक एमआयडीसी विरोधात अपप्रचाराचे एक वादळ आले. बागायती जमीन जाणार,शेतीचे पाणी एमआयडीसीला देणार, अशा अपप्रचाराचे पेव फुटले. बहूतांशी गावांनी विशेष ग्रामसभा घेऊन एमआयडीसीला विरोध केला. यामुळे आर. आर. पाटील यांनी भू -संपादनाचे काम थांबविण्याचे आदेश दिले होते.
२०१४ साली राज्यात महायुतीचे सरकार आले. २०१५ साली आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर एमआयडीसी रद्द होण्याच्या मार्गावर होती. परंतू आमदार सुमनताई आणि मी मात्र आशा सोडलेली नव्हती. विरोध असलेली गावे वगळून मिनी एमआयडीसी उभी करण्यासाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी तत्कालीन उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांचेकडे केली होती.
एमआयडीसी उभी करण्यासाठी तातडीने सर्व्हे करा आणि अहवाल पाठवा असे आदेश उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी प्रादेशिक अधिका-यांना दिले होते.तसा अहवाल पाठविण्यात आला. 'एमआयडीसी' ने अहवाल राज्य सरकारला पाठविल्यानंतर आम्ही शिंदे - फडणवीस यांच्या सरकारकडे पाठपुरावा केला. आमच्या अविरत प्रयत्नामुळे सदरच्या योगेवाडी - मणेराजुरी एमआयडीसीला टेंभू उपसा सिंचन योजनेचे बिगरशेती वाटपाचे ०.४६५९ द.ल.घ.मी.पाणी देण्याची मागणी १९ जुलै रोजी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी मंजूर केली आहे. त्यानुसारच योगेवाडी - मणेराजूरी या औद्योगिक क्षेत्रास पाणी पुरवठा करणेसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेतुन पिण्यासाठी ०.०९३२ दलघमी व औद्योगिकरणासाठी ०.३७२७ दलघमी असे एकुण ०.४६५९ दलघमी बिगर सिंचन पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले.
रोहित पाटील म्हणाले, २९ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या ३९३ व्या बैठकीमध्ये ठराव क्रमांक ६४५१ अन्वये योगेवाडी - मणेराजुरी मिनी एमआयडीसी च्या औद्योगिक क्षेत्रातील भूखंड वाटपाचा दर निश्चित करण्यात आला आहे. भूखंड वाटप करताना औद्योगिक दर, निवासी दर आणि व्यापारी दर या तीन प्रकारांमध्ये भूखंडांचे दर निश्चित केलेले आहेत. पायाभूत सुविधांचा विकास झालेनंतर लवकरच एमआयडीसी मधील भूखंडांचे वाटप केले जाणार आहे.
रोहित पाटील म्हणाले, आता योगेवाडी गावाच्या हद्दीतील ३७ हेक्टर तर मणेराजुरी गावाच्या हद्दीतील ६९ हेक्टर अशी जमीन एमआयडीसीच्या ताब्यात आहे. सुरुवातीस योगेवाडी गावाच्या हद्दीतील ३७ हेक्टर जागेवर उद्योग उभारणी होईल. आता मंजूर झालेल्या १८ कोटी रुपये निधीतून योगेवाडी हद्दीतील ३७ हेक्टर क्षेत्रामध्ये रस्ते बांधण्यात येणार आहे. सदर भागामध्ये वीज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मणेराजुरी पाणी साठवण तलावातून या एमआयडीसी पर्यंत पाणीयोजना करण्यात येणार आहे.