सांगली जिल्ह्यात 1440 गुन्हेेगार ‘वॉन्टेड’! | पुढारी

सांगली जिल्ह्यात 1440 गुन्हेेगार ‘वॉन्टेड’!

सांगली ः सचिन लाड जिल्ह्यातील खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, लुटमार, घरफोडी अशा अनेक गंभीर गुन्ह्यात 1 हजार 440 गुन्हेगार ‘वॉन्टेड’ आहेत. यातील गेल्या वर्षभरात केवळ 194 जणांना पकडण्यात यश आले आहेत. सुनावणीला गैरहजर राहणार्‍या 173 गुन्हेगारांना न्यायालयानेही आता फरारी घोषित केले आहे. दरम्यान, सन 1973 पासून अनेक गुन्हेगार ‘क्राईम ब्रँच’च्या ‘रडार’वर आहेत.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख नजरेत भरण्यासारखा राहिला आहे. सातत्याने गुन्हेगारीत चढ-उतार राहिला आहे. त्यामुळे फरारी गुन्हेगारांची संख्या वाढतच राहिली. पोलिसांच्या यादीवर तब्बल 1973 पासून अनेक गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार फरारी असल्याची नोंद आहे. हे गुन्हेेगार जिवंत तर आहेत का नाही, याची पोलिसांनाही खबर नाही. त्यांच्या गावी जाऊन घरावर छापे टाकले जातात, पण ते सापडत नाहीत. त्यांचे नातेवाईकही ‘आम्हाला काय माहिती नाही’, असे सांगतात.

जिल्ह्यात 25 पोलिस ठाणी आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात फरारी गुन्हेगारांची नोंद आहे. पोलिस कर्मचार्‍यांना दैनंदिन कामाचा ताण असल्याने त्यांचे फरारींना पकडण्याकडे दुर्लक्ष होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण (लोकल क्राईम ब्रँच) विभागाकडेच फरारींना पकडण्याची जबाबदारी सोपविली आहे. अनेकदा या विभागाने फरारी गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोहीम उघडली आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी विविध गंभीर गुन्ह्यातील 194 जणांना पकडले आहे. तरीही फरारींची संख्या कमी झालेली नाही.

जिल्ह्यापेक्षा परराज्यांतील फरारी गुन्हेेगारांचा आकडा मोठा आहे. परजिल्हा व पराराज्यांत नेहमी जाणे शक्य होत नसल्याने फरारी गुन्हेगारांचा हा आकडा कधी कमीच झालेला नाही. बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, औरंगाबाद, परभणी, नांदेड, मुंबई, सातारा तसेच आसाम, पश्चिम बंगाल, बंगळूर, उत्तरप्रदेश, बिहारमधील अनेक गुन्हेगार ‘वॉन्टेड’ यादीत आहेत.

हेही वाचलतं का?

Back to top button