सातारा : पोलिस ठाण्याचे लॉक तोडून दरोडेखोर पळाले; पोलिसांना मारहाण | पुढारी

सातारा : पोलिस ठाण्याचे लॉक तोडून दरोडेखोर पळाले; पोलिसांना मारहाण

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून दरोड्या सारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी पळाले आहेत. लॉकअपचे दार तोडल्यानंतर पाच दरोडेखोरांनी पोलिस ठाण्यातील पोलिसांना मारहाण केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पहाटे 3 वाजता घडली असून राज्याचे गृहमंत्री जिल्हा दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने पोलिस दल गॅसवर गेले आहे.

सचिन भोसले, राहुल भोसले, अजय भोसले, अविनाश भोसले, होमराज भोसले (सर्व रा. बीड व अहमदनगर जिल्हा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

संशयित दरोडेखोरांना नुकतेच गंभीर गुन्ह्यात अटक केली होती. पोलिस कोठडीत असल्याने त्यांना लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. आज पहाटे मात्र ताकदीच्या जोरावर दरोडेखोरांनी लॉकअपचे दार तोडून पोलिसांना मारहाण करत औंध पोलिस ठाणे हादरवून सोडले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर सातारा पोलिस दल अलर्ट झाले असून दरोडेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

Back to top button