सांगली : आष्टा पोलिसांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न; चिकुर्डेमध्ये युवकाच्या अंगावर घातली गाडी | पुढारी

सांगली : आष्टा पोलिसांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न; चिकुर्डेमध्ये युवकाच्या अंगावर घातली गाडी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील मंडलिक सरपंच काळे या युवकाच्या अंगावर आष्टा पोलिसांनी गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कुटंबियांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना कुटुंबियातील सदस्यांनी निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दि. 30 एप्रिलरोजी चिकुर्डे येथे मंडलिक याच्या अंगावर पोलिसांनी गाडी घातली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. बेशुद्ध अवस्थेत त्याला पोलिसांनी गाडीत घालून घेऊन गेले. त्यानंतर चिकुर्डेचे पोलिसपाटील हे घरी येऊन मंडलिक हा आष्टा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती दिली. नातेवाईक रिना पवार हिने याबाबत आष्टा पोलिसांकडे फोनवरून विचारणा केली. त्यावेळी तो सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असल्याची माहिती देण्यात आली. सध्या त्याच्यावर सिव्हिलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्या जीवाचे बरेवाईट झाले तर जबाबदार कोण? चकमक रंगवून त्याला ठार मारण्याचा डाव आष्टा पोलिसांनी रचला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच जखमी मंडलिक याचा जबाब पोलिस घेणार नाहीत, अशी आम्हाला भीती वाटत आहे. त्यामुळे याची गंभीर दखल देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर चंद्रिका काळे, सारिका काळे यांच्या सह्या आहेत.

सिव्हिलमध्ये मात्र अपघाताची नोंद

सिव्हिलमधील सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मंडलिक याला दि. 30 रोजी आष्टा पोलिसांनी उपचारासाठी अ‍ॅडमिट केले आहे. मंडलिक गाडीवरून पडल्याची नोंद सिव्हिलमध्ये करण्यात आली आहे. मात्र कुटुंबियांनी अंगावर गाडी घातल्याचा आरोप केला आहे. पोलिस दबाव टाकून हे प्रकरण दाबत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.

Back to top button