सांगली : घनकचरा ठरावास काँग्रेसचाही विरोध | पुढारी

सांगली : घनकचरा ठरावास काँग्रेसचाही विरोध

सांगली : पुढारी वृत्तसेवा घनकचरा प्रकल्पाचे काम इको प्रो एनव्हायरनमेंटल सर्व्हिसेस गुजरात या निविदाधारकाकडून करून घेण्याच्या स्थायी समितीच्या ठरावास काँग्रेसनेही विरोध केला आहे. दि. 11 मार्च 2022 रोजीचा ठराव महापालिकेच्या हिताविरोधी आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून फेरनिविदा काढण्याच्या मागणीसाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठविण्याचा निर्णय काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत झाला.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे यांनी मंगळवारी काँग्रेस नगरसेवकांची बैठक बोलवली. मेंढे यांच्यासह नगरसेवक उत्तम साखळकर, संतोष पाटील, अभिजित भोसले, फिरोज पठाण, मनोज सरगर, नगरसेविका रोहिणी पाटील, वर्षा निंबाळकर, शुभांगी साळुंखे, बबिता मेंढे, आरती वळवडे, मदिना बारूदवाले, प्रकाश मुळके, तौफिक शिकलगार तसेच संजय कांबळे उपस्थित होते.

उपमहापौर उमेश पाटील मुंबईला असल्याने बैठकीला उपस्थित नव्हते. उमेश पाटील, मंगेश चव्हाण यांच्यासह पक्षाचे सर्व 21 नगरसेवक काँग्रेसच्या निर्णयासोबत राहणार आहेत, अशी माहिती मेंढे यांनी दिली. घनकचरा प्रकल्पासारखा महत्वाचा विषय स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर न घेता आयत्यावेळी आणून ठराव केल्याबद्दल काँग्रेस नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. ऑगस्ट 2020 मध्येही काँग्रेसने विरोध केला होता. यावेळचा ठरावही महापालिकेच्या हिताचा नसल्याकडे लक्ष वेधत त्याला विरोध करण्याचा निर्णय काँग्रेस नगरसेवकांनी घेतला.

गटनेते मेंढे म्हणाले, घनकचरा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने व त्या निविदेत महापालिकेचे हित नसल्याने दि. 24 ऑगस्ट 2020 रोजी घनकचरा प्रकल्पाच्या निविदेला काँग्रेसने विरोध केला होता. निविदा प्रक्रियेतील त्रुटी दुरुस्त करून फेरनिविदा काढण्याचा ठराव झालेला होता. मात्र निविदा प्रक्रियेतील कोणतीही त्रुटी दुरुस्त न करता दि. 11 मार्च 2022 रोजी स्थायी समितीने चुकीच्या पद्धतीने ठराव केला आहे. निविदा प्रक्रिया लॉकडाऊन कालावधीत काढली होती. म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

नवे फीचर ! व्हॅाटस् अ‍ॅप व्हॅाईस कॅालवर एका वेळी कनेक्ट होतील 32 लोक

हरित लवादाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची निविदा प्रक्रियेस मान्यता घेतली नव्हती. तरिही संबंधित कंपनीची निविदा मंजूर करण्याचा ठराव स्थायी समितीने दि. 11 मार्च 2022 रोजी केला आहे. त्यास विरोध आहे. दरम्यान, भाजपची सत्ता असलेल्या स्थायी समितीने घनकचरा निविदा मंजुरीचा ठराव केला आहे. त्यास भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. काँग्रेस नगरसेवकांनीही घनकचरा प्रकल्पाच्या निविदा मंजुरीच्या ठरावाला विरोध केला आहे. त्यामुळे दि. 11 मार्च 2022 चा ठराव लटकणार असे दिसत आहे.

महापौरपद काँग्रेसला द्या

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत ठरल्यानुसार उर्वरीत सव्वा वर्षासाठी काँग्रेसला महापौरपद मिळावे, अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांनी केली. त्यासंदर्भात नेत्यांना भेटण्याचा निर्णयही बैठकीत झाला.

विशेष महासभेसाठी महापौरांना पत्र देणार

घनकचरा प्रकल्प इको प्रो एनव्हॉयरनमेंटल सर्व्हिसेस गुजरात यांच्याकडून राबविण्यास मान्यता दिलेला स्थायी समिती दि. 11 मार्च 2022 रोजीचा ठराव रद्द करून फेरनिविदा काढण्यासाठी विशेष महासभा बोलविण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थायी समिती सदस्यांचे पत्र महापौर यांना दिले जाणार आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button