सांगली : एटीएम मशिन जेसीबीने फोडण्याच्या प्रयत्न | पुढारी

सांगली : एटीएम मशिन जेसीबीने फोडण्याच्या प्रयत्न

आरग : पुढारी वृत्तसेवा आरग (ता. मिरज) येथील अ‍ॅक्सेस बँकेचे एटीएम मशिन अज्ञात चोरट्यांनी जेसीबीच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश न आल्याने मशिनमधील 24 लाख 6 हजार 700 रुपयांची रक्कम चोरट्यांच्या हाती लागू शकली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी : आरग येथील मुख्य रस्त्यावर असणार्‍या गाळ्यांमध्ये अ‍ॅक्सेस बँकेचे एटीएम मशीन मागील चार महिन्यापूर्वी बसविण्यात आले आहे.

शुक्रवार, दि. 22 रोजी या मशिनमध्ये 24 लाख 6 हजार 700 रुपयांची रक्कम भरण्यात आली होती. यावर अज्ञाताने पाळत ठेवल्याची शंका उपस्थित होत आहे. शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने नजिकच्या पेट्रोल पंपावर उभा असणार्‍या जेसीबीच्या केबीनची काच फोडून आधी जेसीबी चोरी केला. त्यानंतर ज्या ठिकाणी एटीएम आहे तेथे जेसीबीने शटरचा दरवाजा उचकटून काढला. पैसे असणारी मशिन जेसीबी बकेटच्या सहाय्याने उपटून काढण्यात आली.

चोरटा ही मशिन जेसीबीच्या बकेटमध्ये घेऊन पळून जात असताना मशीन सचिवालयाजवळ पडली. पडलेली मशिन पुन्हा बकेटमध्ये घेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यामुळे आहे त्या अवस्थेत त्याच ठिकाणी जेसीबी आणि एटीएम मशिन टाकून चोरट्याने पलायन केले. त्यामुळे 24 लाख 6 हजार 700 रुपयांची रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही.

शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर बँकेचे अधिकारी व मिरज ग्रामीण पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे घटनास्थळी दाखल झाले, घटनेची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि तपासाच्या दृष्टीने पुढील आदेश दिले आहेत.या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. या घटनेबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button