

सांगली : पुढारी वृत्तसेवा
अंकली येथेे पुलाजवळ कृष्णा नदीमध्ये आपल्या 14 वर्षांच्या मुलाला वाचवताना वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मलकाप्पा काशीनाथ असंगी (वय 35, रा. अंकली) असे त्यांचे नाव आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान, असंगी हे बुडाले असल्याची माहिती आयुष हेल्पलाईन टीमला मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ धाव घेत मृतदेह शोधून बाहेर काढला.
पोलिसांनी सांगितले की, असंगी हे अंकली येथे वीटभट्टीवर काम करीत होते. त्यांच्या मुलगा अमित व त्याचा मित्र शेळ्या चारायला घेऊन गेले होते. दुपारी अमितचा मित्र नदीमध्ये पोहण्यासाठी गेला. त्याला पोहता येत नव्हते. तो बुडू लागल्याने त्याला वाचविण्यासाठी अमितने उडी घेतली. मात्र, त्याला बाहेर काढता येईना. त्यावेळी मलकाप्पा असंगी हे जवळच होते. त्यांनी अमितला वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. त्यांनाही पोहता येत नव्हते. त्यावेळी उपस्थित इतरांनीही मदतीसाठी नदीत उड्या घेतल्या. त्यांनी दोन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र, वडील मलकाप्पा यांना पोहता येत नसल्याने ते बुडाले. त्यांचा शोध घेतला; मात्र ते मिळाले नाहीत. त्यानंतर स्वप्निल खोत यांनी ही माहिती आयुष हेल्पलाईन टीमला दिली. हेल्पलाईन टीमला तासाभरानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले.