सांगली : नगरभूमापन कार्यालयातील एजंट लाच घेताना जाळ्यात | पुढारी

सांगली : नगरभूमापन कार्यालयातील एजंट लाच घेताना जाळ्यात

सांगली : पुढारी वृत्तसेवा : वारसांची नोंद करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नगर भूमापन कार्यालयातील एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. प्रमोद काशीनाथ शिंदे, (वय ५३, रा. हिरा कृपा, वसंतनगर, सांगली ) असे अटक केलेल्या एजंटचे नांव आहे. ही कारवाई गणेश नाष्टा सेंटर, विश्रामबाग चौक, विश्रामबाग येथे आज (शुक्रवार) करण्यात आली.

सांगली येथील नगरभूमापन अधिकारी कार्यालयात तक्रारदार वारसांची नावे नोंद करण्यासाठी गेले होते. यावेळी हे काम करण्यासाठी नगरभूमापन अधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी यांना पैसे द्यावे लागतात, असे प्रमोद शिंदे यांने तक्रारदार यांना सांगून ५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर चर्चेअंती ३ हजार रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार यांनी याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार, आज गणेश नाष्टा सेंटर, विश्रामबाग चौकात सापळा लावून शिंदे यांना पैसे घेताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस अंमलदार अविनाश सागर, प्रितम चौगुले, सलिम मकानदार, सीमा माने, संजय संकपाळ, रविंद्र धुमाळ, चालक बाळासाहेब पवार यांनी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button