

सांगली : विवेक दाभोळे
राज्यातील बहुसंख्य दूध संघ चालक तसेच खासगी व्यावसयिकांनी एकत्र येत गाय दुधाची खरेदी 33 रुपये लिटरने करण्याचा निर्णय घेतला आहे. तर विक्री मात्र 52 रुपयांनीच करण्याचा एकमुखी निर्णय झाला आहे. यातून उत्पादक तसेच ग्राहक दोन्ही घटकांची पध्दतशीर लूट सुरू राहणार आहे. राज्यात दुग्धोत्पादनात सांगली जिल्हा साततत्याने आघाडीवर राहिला आहे. आता उन्हाळ्याचा कडाका वाढू लागला आहे. तर याच दरम्यान दुधाचे उत्पादन घटू लागले आहे. याच काळात काही संघचालकांनी गाय दूध खरेदीदरात वाढ केली आहे. मात्र, यात मनमानी होत आहे. याचा फटका दूध उत्पादकाला बसला आहे.
प्रामुख्याने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर या टापूबरोबरच नदीकाठच्या वाळवा, शिराळा, मिरज पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात गाय दुधाचे उत्पादन होते. मात्र, पूर्व भागातील दुभत्या पशुधनाला तर चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंतचा कालावधी हा जादा दुग्धोत्पादनाचा मानला जातो. जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात प्रतिदिन साडेपंधरा लाख लिटरच्या घरात दुधाचे संकलन होत होते. ते आताच 14 लाखांवर आले आहे. तीन महिन्यांपूर्वीपर्यंत प्रतिदिन साडेपंधरा लाख लिटर दुधाचे उत्पादन होत होते. आता तर दुधाचा उत्पादन खर्च वाढला आहे. चार्याची मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. पण, मुळात चाराच कमी उपलब्ध होत आहे. यामुळे भरमसाठ पैसे देऊनदेखील चारा उपलब्ध कोठून करायचा, या प्रश्नाचे उत्तर शेतकर्यांसाठी डोकेदुखीचे ठरू लागले आहे.
दरम्यान, गाय व म्हैस दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय 'गोकुळ' ने घेतला आहे. तसेच राजारामबापू सहकारी दूध संघानेही गाय दूध खरेदीदरात दोन रुपये प्रतिलिटर वाढीचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीमुळे म्हशीच्या 6 फॅट व 9 एस.एन.एफ.करिता 43 रुपये 50 पैसे प्रतिलिटर दर मिळणार आहे. हाच दर पूर्वी 41 रुपये 50 पैसे इतका होता. गायीच्या दुधासाठी 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ.करिता 27 रुपयांवरून आता प्रतिलिटर 29 रुपये दर मिळणार आहे. एकीकडे दुधाचे दर परवडत नाहीत. तर दुधाच्या भुकटीचे दर कोसळले आहेत. दोन वर्षांपूर्वी सरकारने प्रतिलिटर दुधासाठी भुकटीकरिता तीन रुपयांचे अनुदान जाहीर केले तरी त्याचे 'लोणी' दूधउत्पादकाला मिळालेच नव्हते. आता तर काही संघचालकांनी गाय दूध दरात वाढ केली आहे, पण ही दरवाढ 'लोणी' उत्पादकापर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे.
साधारणपणे सन 2014, 2019 सारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. महागडा चारा आणि पशुखाद्याचे महागडे दर यामुळे दुधाचा उत्पादन खर्च वाढला आहे. तर हिरवा चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. यामुळे दुभती जनावरे दावणीला ठेवणे सामान्य शेतकर्याला परवडत नाही.
दूध दरवाढ किती खरी, उत्पादकाला त्याचा फायदा किती, हे सवाल यातून अनुत्तरीतच रहात आहेत. सध्या राज्यात काही दूध संस्थांनी गायीच्या दूध खरेदी दरात वाढ केली आहे. मात्र, अजूनही काही दूध संघ याबाबतीत अलिप्तच राहिले आहेत. हा 'अलिप्ततावाद'च उत्पादकांसाठी हानीकारक ठरू लागला आहे. उत्पादकाला त्याच्या खर्चाचा पुरता मोबदला मिळाला पाहिजे. यासाठीच आम्ही माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करू. – संदीप राजोबा, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना