सांगली : जाडरबोबलाद येथील तिघांवर प्राणघातक हल्ला, तिघे गंभीर जखमी  | पुढारी

सांगली : जाडरबोबलाद येथील तिघांवर प्राणघातक हल्ला, तिघे गंभीर जखमी 

जत, पुढारी वृत्तसेवा : जाडरबोबलाद (ता. जत) येथील तिघांवर दबा धरून प्राणघातक हल्ला केला आहे. ही घटना रविवारी रात्री मंगळवेढा तालुक्यातील लवंगी गावाच्या हद्दीत असणार्‍या वनविभागात घडली आहे. हल्लेखोराने तलवारीने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात विठ्ठल रामचंद्र बरूर, दयानंद मल्लेशप्पा बरूर आणि महादेव रामचंद्र बरूर (तिघेही रा. जाडरबोबलाद) हे गंभीर जखमी आहेत. यात एकाचा हात तोडला आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत. तिघांवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने यांनी तातडीने रविवारी (दि. २७) रात्री भेट दिली. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेतून सांगली येथे पाठवण्यात आले आहे. सदरची घटना मंगळवेढा तालुका हद्दीत घडली असल्याने घटनास्थळावरून तलवार मंगळवेढा पोलिसांनी जप्त केली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जाडरबोबलाद येथील विठ्ठल रामचंद्र बरूर, त्यांचे भाऊ व अन्य एकजण मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथे एका नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारसाठी गेले होते. रात्री ते गावाकडे परतणार असल्याची कुणकुण हल्लेखोरांना लागली होती. ते लवंगी गावातून बाहेर पडणाऱ्या वनविभागात दबा धरून बसले होते. दरम्यान विठ्ठल बरुर, दयानंद मल्लेशप्पा बरूर ,महादेव रामचंद्र बरूर हे तिघेजण मोटरसायकलवरून लवंगी येथील वनविभागाजवळून जाणाऱ्या रस्त्याजवळून जात होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी सशस्त्र तलवारीने जोरदार हल्ला केला.

या हल्ल्यात एकाचा हात तोडला, तर एकाच्या पायावर तलवारीने जोरदार हल्ला केला आहे. तसेच तिसऱ्या व्यक्तीच्या तोंडावर जोरदार घाव घातले आहेत. ही घटना भावकीतील जमिनीच्या आणि पूर्ववैमनस्यातून घडली असल्याचे चर्चा घटनास्थळी सुरू होती. जखमी व हल्लेखोर हे दोन्ही जत तालुक्यातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोमवारी रात्री उशिरा मंगळवेढा पोलीस सांगली येथे रुग्णालयात जावून जखमीकडून जबाब घेण्याचे काम सुरू होते. सदरचा जबाब नोंदविल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलतं का?

Back to top button