डोंबिवली क्राईम : उच्चशिक्षित तरुण निघाला एटीएम चोर; पोलिसांनी पकडले रंगेहात | पुढारी

डोंबिवली क्राईम : उच्चशिक्षित तरुण निघाला एटीएम चोर; पोलिसांनी पकडले रंगेहात

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : पोलीस पेट्रोलिंग करत असताना शटर बंद असणाऱ्या एटीएम मशिनच्या गाळ्यातून ड्रीलमशिनचा आवाज येत असल्याचे पेट्रोलिंग पथकाचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लागलीच सतर्कता बाळगून चोरांना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे हा चोर उच्च शिक्षित असून तो सिस्को कंपनीत काम करत असल्याचे चौकशी दरम्यान सांगितले. (डोंबिवली क्राईम)

दरम्यान महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील एटीएम मशीन तांत्रिक पद्धतीने फोडून गुन्हे केले असावेत असा संशय आहे. मध्य प्रदेश येथे राहणारा राहुल चोरडीया (वय-३५) यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एटीएम फोडण्यासाठी लागणारे १४,३०० रुपयाचे साहित्य त्यात ड्रील मशीन, स्क्रू-ड्रायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पिन, एमसील अशा वस्तू आढळून आलेल्या आहेत.

शनिवारी रात्री दोन वाजता मानपाडा सर्कलचे ठिकाणी असलेल्या एक्सिस बँकेचे एटीएमचे शटर हे बंद अवस्थेत होते. मात्र आतून कसला तरी आवाज येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. शटर ठोठावले असता आतून आवाज येणे बंद झाले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.  त्यानंतर पोलिसांनी हळूच शटर उघडल्या नंतर त्यांनी पोलिसांना धक्का देऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याची झडती घेतली असता त्याचेकडे असलेल्या काळया रंगाचे बॅगमध्ये एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. (डोंबिवली क्राईम)

त्याने सदरचे साहित्य एटीएम मशिन तोडून त्यातील पैसे चाेरण्यासाठी जवळ बाळगले असल्याचे सांगितले. परंतु त्याचा चोरी करण्याचा सदरचा प्रयत्न पोलिसांचे सतर्कपणामुळे अयशस्वी झाला आहे. अधिक तपास उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

पहा व्हिडिओ : सांगली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज जिल्हा संपन्न

Back to top button