सांगली : वीज बिल घोटाळाप्रकरणी चौकशी समिती | पुढारी

सांगली : वीज बिल घोटाळाप्रकरणी चौकशी समिती

सांगली पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या पथदिवे वीज बिल घोटाळाप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. अपहाराची जबाबदारी निश्चित करणे व वसुलीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी ही समिती नियुक्त करण्यात आली आहे. सखोल चौकशी करून महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश चौकशी समितीला दिले आहेत.

‘नगरविकास विभागाच्या दि. 27 डिसेंबर 2021 च्या पत्रान्वये महापालिकाच्या पथदिवे वीज बिलामध्ये झालेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने लेखाधिकारी यांनी प्राथमिक चौकशी केली आहे. महानगरपालिकेकडील विद्युत विभाग, लेखापरीक्षण विभाग व लेखा विभाग यांच्याकडून झालेल्या प्रशासकीय कसुरीमुळे अपहार झाल्याची बाब महानगरपालिकेच्या निदर्शनास आली आहे.

यामध्ये महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधितावर जबाबदारी निश्चित करणे व रक्कम वसुलीची कार्यपद्धती निश्चित करणे आवश्यक असल्यामुळे चौकशी समिती नियुक्त करण्यात येत आहे’, असे जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

अप्पर जिल्हाधिकारी अध्यक्ष

चौकशी समितीच्या अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, महावितरणचे अधीक्षक अभियंता (मंडल कार्यालय विश्रामबाग), सहायक संचालक स्थानिक निधी व लेखापरीक्षा हे चौकशी समितीचे सदस्य आहेत.

जिल्हा प्रशासन अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. वीज बिल घोटाळाप्रकरणी चौकशी समितीने सखोल चौकशी करावी. एक महिन्यात अहवाल सादर करावा, असा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

लवकरच गुन्हा दाखल

महापालिकेच्या पथदिवे मासिक वीज बिलातील घोटाळ्याप्रकरणी महावितरणचे तत्कालीन अतिरिक्त कार्यकारी अभियंता व बोगस बिल तयार करणारे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी यापूर्वी सहायक आयुक्तांना दिले आहेत. याप्रकरणी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असून लवकरच गुन्हा दाखल होईल.

हेही वाचा

Back to top button