

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक महामारी कोरोनाबाबत (Corona) पुन्हा एकदा चिंताजनक बातम्या येऊ लागल्या आहेत. चीनमध्ये नवी लाट पसरवल्यानंतर आणि रुग्णांची संख्या झपाट्याने वाढवल्यानंतर आता इस्रायलमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याने खळबळ उडाली आहे.
इस्रायलमध्ये कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट सापडल्याचे समोर आले आहे. तेथील आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. तथापि, आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना याची फारशी चिंता नाही. हा नवीन प्रकार कोविड-19 च्या ओमायक्रॉन प्रकारातील BA.1 आणि BA.2 या दोन उप-प्रकारांचे मिश्रण आहे. त्याचे नाव आणि लक्षणे आणि त्यावर उपाय याविषयी काहीही स्पष्ट नाही. बेन गुरियन विमानतळावर फ्लाइटने पोहोचलेल्या दोन किशोरवयीन मुलांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे. दोन्ही मुलांना ताप, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे अशी सौम्य लक्षणे जाणवली. दोघांच्या आरटी पीसीआर अहवालात कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला. या व्हेरिएंटबद्दल जगाला कोणतीही माहिती नसल्याचेही त्यांनी म्हटले. नवीन व्हेरिएंटवर संशोधन सुरू आहे, अशी माहिती इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
इस्रायली तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन स्ट्रेन एकत्र येऊन तिसरा व्हेरिएंट तयार होणे सामान्य आहे. जेव्हा एकाच पेशीतील दोन विषाणू एकत्र येतात तेव्हा त्याचा वेगाने प्रसार होतो आणि अनुवांशिक गुणधर्मांचे अदान-प्रदान केले जाते. अशा प्रकारे नवीन विषाणू जन्माला येतात. हे किती धोकादायक किंवा चिंताजनक आहेत याबद्दल काहीही सांगता येत नाही.
इस्रायलच्या ९.२ मिलियन लोकसंख्येपैकी ४ मिलियन हून अधिक लोकांना कोरोना विषाणू लसीचे प्रत्येकी तीन डोस मिळाले आहेत. असे असूनही, संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. चीनमध्ये कोरोना पुन्हा एकदा भीतीचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत नव्या व्हेरिएंटचे रुग्ण इतर देशांमध्येही आढळतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
ओमायक्रॉन गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. हा कोरोनाचा (Corona) सर्वात वेगाने पसरणारा संसर्ग मानला जातो. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉनमुळे मृत्यू आणि संक्रमणाची संख्या खूपच कमी आहे. आता हे पाहावे लागेल की ओमिक्रॉनच्या दोन जातींचा समावेश असलेला नवीन प्रकार इस्रायलमध्ये येतो का आणि ते रोखण्यासाठी अँटी-कोरोना लस किती प्रभावी ठरतात.
आता हे पाहावे लागेल की, ओमायक्रॉनच्या दोन स्ट्रेनमुळे निर्माण झालेल्या नव्या व्हेरिएंटचा जगाला किती धोका आहे याकडे शास्त्रज्ञांसह सर्वांचे लक्ष आहे. या व्हेरिएंटवर कोरोना लस किती प्रभावी ठरेल हेही येत्या काळात आपल्याला समजेल.