स्वतंत्र सांगली तालुका रखडलाच! | पुढारी

स्वतंत्र सांगली तालुका रखडलाच!

सांगली : शशिकांत शिंदे

स्वतंत्र सांगली तालुका करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. पलूस, कडेगाव या तालुक्यांची निर्मिती झाली. मात्र, सांगली तालुक्याचा प्रस्ताव अनेक वर्षे प्रलंबितच आहे. त्याकडे राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी यांचे दुर्लक्ष आहे.

तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातून स्वतंत्र सांगली जिल्ह्याच्या निर्मितीनंतर मिरज तालुक्यात सांगलीचा समावेश करण्यात आला. लोकसंख्या, क्षेत्रफळ यांचा विचार करता तत्कालीन महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी स्वतंत्र सांगली तालुक्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र तो अद्याप प्रत्यक्षात आलेला नाही. त्यानंतर कडेगाव, पलूस हे तालुके स्वतंत्र झाले. जिल्ह्यातील नेत्यांचे सांगलीकडे दुर्लक्ष आहे, अशी सांगलीकर नागरिकांची प्रतिक्रिया आहे.

महायुती सरकारच्या काळात आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली तालुक्याचा नव्याने प्रस्ताव देत पाठपुरावा केला. मात्र, राज्यात गेल्या काही वर्षांत स्वतंत्र तालुक्यांची निर्मिती झालेली नाही. त्याऐवजी अप्पर तहसील कार्यालये सुरू करण्यात आली. जिल्ह्यात आष्टा आणि संख आणि त्यानंतर सांगलीसाठी अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले आहे.

सांगलीतील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे कार्यालय सुरू आहे. या ठिकाणी महसूल, दाखले, प्रमाणपत्र देण्याचे काम चालते. मात्र, इतर कामांसाठी लोकांना मिरजेतच जावे लागते. अप्पर तहसील झाल्यानंतर स्वतंत्र तालुका निर्मितीसाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या कोणत्याच हालचाली दिसत नाहीत.

पश्चिम भागातील लोकांची गैरसोय थांबेल

सध्याचा मिरज तालुका लोकसंख्या आणि क्षेत्रफळाने खूपच मोठा आहे. लोकसंख्याही वाढत असल्याने कामाचा ताण मिरज तहसील कार्यालयावर वाढतो आहे. त्याशिवाय तालुक्याच्या पश्चिम भागात राहणार्‍या लोकांना कार्यालयाच्या ठिकाणी येण्यासाठी अंतर अधिक आहे. त्यामुळे स्वतंत्र सांगली तालुका करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. यातून या लोकांची गैरसोय थांबेल.

Back to top button