कोल्हापूर : घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करा | पुढारी

कोल्हापूर : घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : घनकचरा व्यवस्थापन कायद्याची, बर्मन आयोगाची अंमलबजावणी करा, या प्रमुख मागणीसाठी कचरावेचक महिलांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आठ दिवसांत मागण्यांबाबत कार्यवाही झाली नाही, तर शहरात चक्का जाम करू, असा इशारा आंदोलकांनी दिला.

‘अवनी’ व ‘एकटी’ संस्थेच्या नेतृत्वाखाली महिलांचा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत महिलांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे काम कचरावेचक महिलांना द्या, झूम प्रकल्पातील कचरा वर्गीकरणाचे काम बचत गटांना द्या, शहरात वॉर्डनुसार कचरा वर्गीकरण केंद्र स्थापन करा, प्लास्टिक कलेक्शन सेंटर सुरू करा, निरुपयोगी प्लास्टिक ट्रेडिंगसाठी युनिट उभारा, विभागनिहाय खतनिर्मिती प्रकल्प सुरू करून बचत गटांना चालवण्यासाठी द्या, कचरावेचक महिलांना ओळखपत्र द्यावे आदी मागण्या यावेळी केल्या.

शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली.जिल्हास्तरावरील मागण्यांसह 2005 च्या बर्मन आयोगाची अंमलबजावणी करा, राज्यात कल्याणकारी मंडळ स्थापन करा, कचरावेचक महिलांना खावटी योजना सुरू करा, आरोग्य कार्ड द्या आदी मागण्यांचेही निवेदन देण्यात आले. या मोर्चात अक्काताई गोसावी, भारती कोळी, संगीता लाखे, वनिता कांबळे, अन्नपूर्णा कोगले, जरीना बेपारी, सुवर्णा सकट, किरण नाईक, लक्ष्मी कांबळे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.

Back to top button