सांगली : खा. संजय पाटील यांनी राजीनामा द्यावा | पुढारी

सांगली : खा. संजय पाटील यांनी राजीनामा द्यावा

तासगाव : पुढारी वृत्तसेवा 

महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला असे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यावेळी सभागृहात उपस्थित असणार्‍या खासदार संजय पाटील यांनी स्वाभिमान असेल तर राजीनामा देऊन महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही हे कृतीतून दाखवून द्यावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी दिले.

येथे ‘नरेंद्र मोदी माफी मागो’ या आंदोलनात ते बोलत होते. खासदार पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून हे आंदोलन करण्यात आले. आमदार विक्रम सावंत यांच्यासह जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी आयोजन केले. विशाल पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी लोकसभेत महाराष्ट्राचा अपमान करीत होते. त्यावेळी खासदार पाटील शांतपणे कसे बसले होते? स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.

आमदार विक्रम सावंत म्हणाले, निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. माजी नगराध्यक्ष अजय पाटील, विवेक गुरव, महेश पाटील, शरद शेळके, रवी साळुंखे, मीनाक्षी शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदारांनी स्वाभिमान दाखवावा : पाटील

विशाल पाटील यांनी खासदार पाटील यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, तुमची लाखांची प्रॉपर्टी हजार कोटीत गेली आहे. आता तरी महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवा.

Back to top button