रेठरे धरण : रेठरे धरणमध्ये आढळला मृत बिबट्या | पुढारी

रेठरे धरण : रेठरे धरणमध्ये आढळला मृत बिबट्या

रेठरे धरण : पुढारी वृत्तसेवा
रेठरे धरण (ता. वाळवा) येथे रविवारी सकाळी नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. बिबट्याचे वय अंदाजे 2 वर्षे आहे. गेल्या दोन वर्षांतील बिबट्याचा हा पाचवा बळी गेला आहे. वन विभागाने घटनास्थळी भेट दिली. बिबट्याचे इस्लामपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले.

छातीवर खोलवर जखमा : दोन वर्षांत पाच बिबट्यांचा बळी

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संपत मदने हे रविवारी सकाळी रेठरेधरण-ओझर्डे हद्दीवरील शेतामध्ये शाळू कापणीसाठी गेले होते. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर बिबट्या मृतावस्थेत पडलेला दिसला. त्यांनी ही माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल सचिन जाधव, डॉ. अजित साधने, वनरक्षक रायना पाटोळे, वनपाल सुरेश चरापले, अमोल साठे, शहाजी खंडागळे, अनिल पाटील, धोंडिराम उगळे, सचिन कदम, प्राणीमित्र गणेश निकम, युनूस मणेर आदींनी घटनास्थळी भेट दिली. वन विभागाने घटनास्थळाची पाहणी करून बिबट्याचा मृतदेह इस्लामपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणला. त्या ठिकाणी डॉ. वंजारी यांनी बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

दोन वर्षात पाच बळी…

गेल्या दोन वर्षात पाच बिबट्यांचे बळी गेले आहेत. त्यामध्ये महामार्ग ओलांडताना वाहनाला धडकून चार बिबट्यांचा मृत्यू झाला होता. येडेनिपाणी, कामेरी, ओझर्डे, रेठरेधरण, पेठ, महादेववाडी, माणिकवाडी, काळमवाडी, नेर्ले, कासेगाव, वाटेगाव, कापुसखेड आदी परिसरातही बिबट्यांचा वावर आहे. यामुळे या परिसरात नेमके किती बिबटे आहेत याचा अंदाजही लोकांना येत नाही.

मृत बिबट्याच्या छातीवर खोलवर दात घुसल्याने जखमा झाल्या आहेत. त्यामुळे दोन बिबट्यांच्या संघर्षामध्ये बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. बिबट्याच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले आहे. त्याचे अवयव प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल.
– सचिन जाधव, वनक्षेत्रपाल, वाळवा-शिराळा तालुका

 

Back to top button