नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नानासाहेब कापडणीस यांचा खून केल्यानंतर त्यांची मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न करणार्या संशयित राहुल जगताप याने केलेले अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यानुसार नानावली येथे नानासाहेब यांनी घेतलेल्या दुकानात राहुलने शुज विक्रीचा व्यवसाय थाटल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांनी दुकानातील मुद्देमाल सील केला आहे. दरम्यान, सोमवारी (दि.28) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
संशयित राहुल गौतम जगताप (36, रा. पंडित कॉलनी) याने डिसेंबर 2021 मध्ये नानासाहेब कापडणीस व त्यांचा मुलगा डॉ. अमित यांचा खून केला. त्यानंतर नानासाहेब यांचा मोबाइल वापरून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार केले. खून केल्यानंतर नानासाहेब यांनी नानावली येथे घेतलेल्या दुकानाचे पैसेही राहुलने भरून दुकानाचा ताबा घेतल्याचे समोर येत आहे. व्यवसाय करण्याच्या हेतूने राहुलने या दुकानात विक्रीसाठी शुज आणल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, राहुल याचे बिंग फुटल्याने त्याचा हा प्लॅनही फसला आहे. पोलिसांनी दुकानासह दुकानातील मुद्देमाल सील केला आहे. राहुल याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या प्रकरणी राहुल याच्यासह प्रदीप शिरसाठ, सूरज मोरे व विकास हेमके या तिघा संशयितांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके बनवली असून, नाशिकसह गोवा येथे त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांना अटक केल्यानंतर या गुन्ह्यातील अनेक महत्त्वाच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांना आहे.