सांगली : पुढारी वृत्तसेवा
स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तासगाव येथील एकाला मरेपर्यंत जन्मठेप व 25 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.
अहमदनगर जिल्ह्यातील एक कुटुंब कामानिमित्त तासगाव परिसरातील एका गावात राहत होते. पती, पत्नी त्यांचा मुलगा व मुलगी असे चौघेजण एकत्र राहत होते. दि. 23 एप्रिल 2019 रोजी रात्री सर्व कुंटुंबिय झोपले असताना आरोपीने स्वत:च्या मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या पत्नीने प्रतिकार केला. आरोपीने तिला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
घटनेनंतर मुलीच्या आईने तासगाव पोलिस ठाण्यात पतीविरूध्द फिर्याद दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक यू. एम. दडिले यांनी तपास करून आरोपीविरूध्द आरोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, तिची आई व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. न्यायालयाने उपलब्ध साक्षी, पुरावे ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरविले. भा. दं. वि. कलम 376(2) (एफ), 376 (3), 323 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याचे कलम 6 अन्वये दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेप व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन वर्षे जादा शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
हा खटला न्यायाधीश हातरोटे यांच्या विशेष न्यायालयात चालला. या खटल्याची सुनावणी जलद गतीने झाली. एक महिन्याच्या आत निकाल लागला. त्याबद्दल जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख तसेच पीडित मुलीला विशेष नुकसान भरपाई तातडीने मिळवून दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अभिनंदन केले जात आहे.