सांगली : ना पावती, ना बिल, सुपारी कारखान्याला 18 हजारांत पाणी; 7 अनधिकृत कनेक्शन | पुढारी

सांगली : ना पावती, ना बिल, सुपारी कारखान्याला 18 हजारांत पाणी; 7 अनधिकृत कनेक्शन

सांगली : पुढारी वृत्तसेवा

एका सुपारी कारखान्याला दोन वर्षांपूर्वी 18 हजार रुपयांत पाणी कनेक्शन दिले आहे. त्याची पावतीही दिली नाही आणि पाण्याचे बिलही आले नसल्याची तक्रार समोर आली आहे. दरम्यान, महापालिकेने गुरुवारी 4 हजार 150 नळकनेक्शन्सचा सर्व्हे केला. त्यामध्ये 7 कनेक्शन्स अनधिकृत आढळली.

कलानगर येथील एका सुपारी कारखान्याला दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या एका कर्मचार्‍याने पाणी कनेक्शन दिले होते. मात्र, त्याची पावती दिली नाही. पाण्याचे बिलही आले नसल्याची तक्रार आल्याची माहिती नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिली. पंचशीलनगर येथे 8 हजार रुपये घेऊन पाणी कनेक्शन दिले आहे. त्यांनाही पावती दिली नाही. दीड वर्षात पाणी बिलही आले नसल्याची तक्रारही असल्याचे साखळकर
यांनी सांगितले.

शिंदे मळा, कलानगर परिसरात 15 नळ कनेक्शन अनधिकृत सापडल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत आयुक्त कापडणीस यांनी सांगली आणि कुपवाड परिसरातील नळ कनेक्शनचा सर्व्हे सुरू करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सुचनेनुसार पाणीपुरवठा अधिकारी परमेश्वर अलकुडे, अधीक्षक उज्वला शिंदे आणि विशेष अभियंता सुनील पाटील यांनी सर्वेची कार्यवाही सुरू केली आहे. अनधिकृत 15 कनेक्शन्स तोडली आहेत.

औद्योगिक वसाहत, खणभागात आढळली अनधिकृत कनेक्शन्स

सांगली, कुपवाड परिसरातील 61 हजार कनेक्शन्सचे सर्वेक्षण होणार आहे. त्यापैकी 4 हजार 150 कनेक्शन्सचे सर्वेक्षण गुरूवारी झाले. त्यामध्ये अनधिकृत 7 कनेक्शन्स आढळली. औद्योगिक वसाहतीमध्ये 1 आणि खणभागात 6 नळ कनेक्शन अनधिकृत सापडली आहेत. या 7 नळ कनेक्शनधारकांकडे नळ कनेक्शनबाबत कसलीही कागदपत्रे आढळून आली नाहीत.
तीन कनेक्शन विनामीटर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाने रीतसर पंचनामा केला आहे. अनधिकृत नळ कनेक्शन शोधमोहीम 24 तारखेपर्यंत अधिक गतीने सुरू ठेवण्यात येणार आहे. दरम्यान कनेक्शनबाबतच्या तक्रारीबाबत 9 अर्जही प्राप्त झाले आहेत. ज्या नळ कनेक्शनधारकांना आपल्या कनेक्शनबाबत शंका किंवा बिलाबाबत तक्रार असेल त्यांनी पाणीपुरवठा विभागात अर्ज दि. 23 फेब्रुवारी पर्यंत दाखल करावेत असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.

पैशांची मागणी केल्यास तत्काळ कळवा

नळ कनेक्शन अधिकृत करण्याबाबत तसेच बिल कमी करून देऊ किंवा अन्य कोणत्याही प्रशासकीय कामासाठी कोणी पैशांची मागणी केल्यास तत्काळ महापालिकेशी संपर्क साधावा. संबंधित व्यक्‍तीची माहिती द्यावी. नागरिकांनी पाणी बिल हे समक्ष पाणीपुरवठा कार्यालय येथे किंवा ऑनलाईन पद्धतीने भरावे. रीतसर पावती घ्यावी, असे आवाहन प्रभारी पाणीपुरवठा अधिकारी परमेश्‍वर हलकुडे यांनी केले आहे.

 

Back to top button