Water bill scam : ‘त्या’ कर्मचार्‍याची जाणार नोकरी; दाखल होणार गुन्हा | पुढारी

Water bill scam : ‘त्या’ कर्मचार्‍याची जाणार नोकरी; दाखल होणार गुन्हा

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडील पाणी बिल घोटाळ्यातील (Water bill scam) मानधनावरील कर्मचार्‍याची नोकरी जाणार आहे. संबंधित कर्मचार्‍यावर फौजदारी गुन्हाही दाखल होणार आहे. तसे आदेश आयुक्‍त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत. दरम्यान, पाणी बिलासंदर्भात नगरसेवकांकडे ग्राहकांच्या तक्रारी सुरूच आहेत.

महापालिकेच्या एका मानधनावरील लिपिकाने पाणी बिलात 25 हजार रुपयांचा अपहार केल्याचे कबूल केले आहे. या लिपिकाने 50 हजार रुपये घेतले; पण महापालिकेत जमा केले नाहीत, अशी तक्रार ग्राहकाची होती. दरम्यान, पाणी बिलातील अपहाराच्या तक्रारी वाढत आहेत. बिल भरण्यासाठी पैसे घेतले; पण पावती दिली नाही आणि आता पाण्याचे बिलही दिले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

नगरसेवक विजय घाडगे यांच्याकडे एकता कॉलनीतील एका महिलेने तक्रार केली. कर्मचार्‍याने 4 हजार 100 रुपये नेले; पण पावती दिली नसल्याचे सांगितले.

प्रभागातील आणखी एका ग्राहकाने नगरसेवक घाडगे यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे. कर्मचारी 10 हजार रुपये घेऊन गेला आहे. पाणी बिल नंतर येईल म्हणून सांगितले, पण पाणी बिल आलेच नाही, अशी तक्रार आहे.

दरम्यान पाणी बिलात अपहार (Water bill scam) केलेल्या मानधनावरील कर्मचारी ज्या भागात कार्यरत आहे, त्या भागातील ग्राहकांकडे महापालिकेकडून खातरजमा केली जाणार आहे. पाणी बिलाची रक्कम कर्मचार्‍याकडे दिली असेल व त्याने पावती तसेच पाणी बिले दिली नसतील तर संबंधित ग्राहकांनी महापालिकेकडे तक्रार करावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पाणी बिलात अपहार केलेल्या मानधनी कर्मचार्‍याच्या प्रतापाची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. संबंधित कर्मचार्‍याला नोकरीतून कमी करणे तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.

Back to top button