सांगली : आरोग्यदूत कमी पडण्याची भीती! | पुढारी

सांगली : आरोग्यदूत कमी पडण्याची भीती!

मिरज : जालिंदर हुलवान : सांगली जिल्ह्यात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे शासकीय कोरोना (सिव्हील) रुग्णालयामध्ये आरोग्यदूत यांची संख्या कमी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिरजेतील शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. अनेक गरजू रुग्णांना या रुग्णालयाचा मोठा आधार आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि शासनाचे हे कोरोना रुग्णालय आहे. गेल्या दोन वर्षांत दहा हजारहून अधिक रुग्ण येथे बरे करण्यात आले आहेत. अगदी काही डॉक्टर आणि काही आरोग्यदूत  पॉझिटिव्ह आल्या तरीही त्या बर्‍या होऊन पुन्हा कोरोना रुग्णांना सेवा देत आहेत. आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येऊ लागली आहे.

जिल्ह्यात दररोज सुमारे तीनशे ते साडेतीनशे इतके जण कोरोना बाधित होत आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका हद्दीमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. कोरोनातून बरे होण्याचेही प्रमाण अधिक आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे बाराशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. मिरजेतील शासकीय रूग्णालय व सिनर्जी हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांवर उपचार केल जात आहेत.(आरोग्यदूत)

मिरजेतील शासकीय कोरोना रुग्णालयामध्ये 69 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 35 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. सध्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्याच्या रुग्णांसाठी लागणारा ऑक्सिजन पुरेसा आहे. सुमारे 18 किलोलिटर ऑक्सिजन सध्या या रुग्णालयात उपलब्ध आहे. या रुग्णालयात पूर्वी 6 किलोलिटर क्षमता असणारा ऑक्सिजन प्लँट होता. आता याची क्षमत वाढवून 39 किलोलिटर इतका करण्यात आला आहे. 39 किलोलिटर ऑक्सिजन साठवणूक होऊ शकते. या रुग्णालयात 125 व्हेंटिलेटर उपलबध आहेत. अन्य सर्व सोयीसुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.(आरोग्यदूत)

ओमायक्रॉनची तपासणी मिरजेत कधी?
रुग्णालयातील व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबमध्येही सर्व अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित आहेत. मात्र ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी लागणारी यंत्रणा दिल्लीत आहे, येथे उपलब्ध नाही. त्यामुळे या अहवालास विलंब लागतो. त्यामुळे ओमायक्रॉनची तपासणीही मिरजेच्या प्रयोगशाळेत करण्याची व्यवस्था शासनाने करण्याची गरज आहे.(आरोग्यदूत)

सध्या गेल्या वर्षीपेक्षा गांभीर्य कमी आहे व मृत्यू दरही जास्त नाही. ज्या बाधिताला लक्षणे नसतील तर त्याला घरीच राहून उपचार करण्याचा सल्ला दिला जात आहे. लक्षणे जास्त असतील तर कोरोना प्रतिविषाणू औषधे दिली जातात.

ज्यांना जास्त त्रास होत असेल तर त्यांना रुणालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते. सध्या या रुग्णालयात डॉक्टर, नर्स, टेक्निशियन, चतुर्थ श्रेणी वर्ग यासह सर्व कर्मचारी असे तिनशे आरोग्यदूत कार्यरत झाले आहेत. त्यापैकी 200 डॉक्टर उपलब्ध आहेत.

भविष्यात जर रुग्णांची संख्या वाढली तर ही यंत्रणा तोकडी पडणार आहे. प्रशासनाने शासनाकडे पदे भरण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे ही संख्या वाढविण्याची गरज आहे.(आरोग्यदूत)

Back to top button