सांगली : आरटीओच्या त्रासाला कंटाळून रिक्षा चालक एकत्र | पुढारी

सांगली : आरटीओच्या त्रासाला कंटाळून रिक्षा चालक एकत्र

सांगली : पुढारी वृत्तसेवा

पोलिस, आरटीओ आणि यांच्या त्रासाला कंटाळून सांगलीसह जिल्ह्यातील काही रिक्षाचालक एकत्र आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी रिक्षा युनियनची स्थापना केली आहे. येथील आरटीओ ऑफिस जवळ सुरु झालेल्या या संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन आज (सोमवार) राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्ह्यामध्ये सुमारे नऊ हजार रिक्षाचालक आहेत. या रिक्षा चालकांचे विविध प्रश्न आहेत. त्यात कोरोना निर्बंधांमुळे रिक्षाचालक आगोदरच अडचणीत आले आहेत. त्यात त्यांना आरटीओ, पोलिस आणि पोलिसांची वाहतूक शाखा यांच्याकडून विविध प्रकारचे त्रास होत आहेत.

रिक्षा पासिंग करणे, कर्जाचा बँक बोजा चढवणे कमी करणे, रिक्षाचे परमिट ट्रान्सफर करणे, पर्यावरण कर, डुप्लिकेट परमिट करणे, वाहन चालवणे परवाना नुतणीकरण, मयत झाल्यास रिक्षा ट्रान्सफर करणे अशा विविध प्रश्नानासाठी त्यांना आरटीओ कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यासाठी त्यांना दिवस दिवसभर थांबवूनही घेतले जाते.

प्रशासनाच्या या त्रासाला कंटाळून रिक्षा संघटनेचे रामभाऊ पाटील, फिरोज मुल्ला, नितीन वाघमारे, अजित पाटील यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांची भेट घेतली. रिक्षा चालक आणि मालकांचे विविध समस्या त्यांना सांगितल्या. त्यानंतर त्यांनी चर्चेतून रिक्षा चालक आणि मालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी रिक्षा युनियनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार या संघटनेचे कार्यालय आरटीओ ऑफिसच्या जवळच सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आज बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे राहुल पवार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, बल्लू केरीपाळे, हरिदास पाटील, सुरेश इरळे, ज्योती आदाटे आदी उपस्थित होते.

याबाबत रामभाऊ पाटील म्हणाले, रिक्षाची संख्या वाढत आहे. त्यात कोरोनाचे नियम, वाढती बेकारी यामुळे रिक्षा चालकांना फार काही मिळत नाही. त्यात प्रशासनाचा वाढता त्रास आहे. आरटीओमध्ये एजंटकडून गेल्या शिवाय काम लवकर होत नाही. अधिकारीही दिवसभर बसवून ठेवतात. त्यामुळे आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बजाज यांची आम्हाला साथ आहे. रिक्षा चालकांची नियमीत कामे करण्यासाठी हे युनियन काम करणार आहे.

पालकमंत्र्यांच्या उपस्थित शुक्रवारी बैठक : बजाज

याबाबत संजय बजाज म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा. त्यांची कामे तातडीने व्हावीत यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न असतो. रिक्षा चालकांचे विविध प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर बैठक होणार आहे.

Back to top button