तासगाव : पुढारी वृत्तसेवा : पाचवीला पुजलेला दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि द्राक्ष व्यापा-याकडून दरवर्षीच होणारी फसवणूक या संकटामुळे तासगाव – कवठेमहांकाळ मतदार संघातील शेतकरी कोलमडून गेलेला आहे. त्यामुळे शेतीचे कर्ज सरसकट माफ करावे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या सर्वच द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांना एकरी लाख रुपयांची मदत द्यावी. दुष्काळ जाहीर केल्याने सर्व पाणी योजनांची बिले शासनाने भरून मोफत पाणी द्यावे, यासह अन्य मागण्या आमदार सुमनताई पाटील यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केल्या आहेत. Suman Patil
दुष्काळाच्या संकटापाटोपाठ अवकाळी मुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत, परंतू नुकसान भरपाई जाहीर झालेली नाही. आमदार सुमनताई पाटील यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये मंगळवारी लक्षवेधी मांडून आवाज उठवला. Suman Patil
बँका आणि पतसंस्थांसह इतर खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन माझ्या तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षबागा पिकवल्या आहेत. या द्राक्षबागा वाचवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. इतके करुनही अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलेले आहे. शासनाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसह, शेतीची कर्जे माफ करावीत. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना तात्काळ प्रति एकर एक लाख रुपयांची मदत करावी. त्याशिवाय शेतकरी जगू शकणार नाही, अशी आग्रहाची मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी अधिवेशनात केली.
द्राक्षसाठी पिक विमा कालावधीत बदल करावा. गतवर्षी द्राक्षाचा विमा उतरवलेल्या लोकांना वेळेत नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे यावर्षी द्राक्ष बागायतदारांनी विमा उतरविण्याकडे पाठ फिरवली. त्यातच अवकाळीचे संकट आले. त्यामुळे राजकीय उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पिकविमा योजनेत बदल करुन झालेल्या नुकसानीचा तात्काळ भरपाई देण्यासाठी प्रयत्न करावेत. दुष्काळ जाहीर झाल्यामुळे टेंभू, ताकारी, आरफळ या पाणी योजनातून शासनाने पाणी उपलब्ध करून दिले. मात्र त्यासाठी पाणीपट्टी आकारणी केली आहे. ही पाणीपट्टी शासनाने भरावी. पाणी योजनांच्या माध्यमातून तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे.
शासनाने दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व मंडलांचा समावेश केला. मात्र वायफळे मंडलाचा समावेश केला नाही. त्यामुळे या मंडळातील वायफळे, बिरणवाडी, बस्तवडे, दहिवडी, जरंडी, यमगरवाडी या गावावरती अन्याय झाला आहे. याबाबत विचार करून तात्काळ वायफळे मंडलाचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी आमदार सुमन पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा