दुष्काळ पाहणी दौर्‍यातून सांगलीस वगळले; शेतकर्‍यांतून नाराजी

दुष्काळ पाहणी दौर्‍यातून सांगलीस वगळले; शेतकर्‍यांतून नाराजी

सांगली :  दुष्काळ पाहण्यासाठी केंद्राचे पथक राज्यात दाखल झाले आहे. चार पथकांकडून जालना, बीड, धाराशिव, पुणे, सोलापूर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत खरीप हंगामातील नुकसानीची पाहणी करण्यात येणार आहे. या पाहणीतून सांगली जिल्ह्याला मात्र वगळले आहे.

जिल्ह्याच्या बहुतेक भागात दुष्काळ आहे. दुष्काळ जाहीर करताना सुरुवातीला दुजाभाव करण्यात आला. आता केंद्राच्या दुष्काळ पाहणीबाबतही जिल्ह्याला डावलले. त्यामुळे शेतकरी नेते व शेतकरीवर्ग नाराज आहे. दुष्काळामुळे नुकसान व टंचाईची दाहकता कशी, यांसारखे प्रश्न उपस्थित होत आहेत. शिराळा, खानापूर-विटा, कडेगाव, मिरज या चार तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर केला होता. कवठेमहांकाळ, जत, आटपाडी आणि तासगाव तालुक्यांना दुष्काळातून वगळले होते. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली. त्याची दखल घेत तीन मंडल वगळता उर्वरित भागातही दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेल्या यादीत सांगली जिल्ह्यामधील आणखी 37 मंडलांचा समावेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 65 मंडलेे आता मध्यम दुष्काळी ठरणार आहेत.

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने कृषी विभागाचे सचिव प्रिया रंजन यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाचे सदस्य आणि केंद्रातील विविध विभागातील प्रमुख अधिकार्‍यांचे पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून राज्यातील सहा महसूल विभाग मुख्यालयात जाऊन आढावा बैठक, तसेच प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.

पंधरा डिसेंबरपर्यंत चार पथकांकडून पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर चारही पथके पुण्यामध्ये एकत्र येऊन नुकसानीसंदर्भातील अहवाल तयार करतील. त्या अहवालावरून केंद्र सरकार शेतकर्‍यांसाठी भरीव मदत जाहीर करण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात दुष्काळाची बिकट स्थिती आहे. पथक जिल्ह्यात की येणार नाही, याबाबत मी बुधवारी (दि. 13) दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहे. दुष्काळात जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न असणार आहे.
– संजय पाटील, खासदार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news