सांगली : द्राक्षशेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; दरवर्षी दोन हजार कोटींचा फटका | पुढारी

सांगली : द्राक्षशेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; दरवर्षी दोन हजार कोटींचा फटका

दिलीप जाधव

तासगाव : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण या अस्मानी, तर द्राक्ष व्यापार्‍यांचे दर पाडण्याचे कारस्थान आणि पैसे बुडवून पलायन करण्याची परंपरा, या मानवनिर्मित संकटामुळे दोन – तीन वर्षांपासून द्राक्षशेतीस दरवर्षी जवळपास दोन हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त आर्थिक फटका बसत आहे. दरवर्षीच होणार्‍या या नुकसानीमुळे द्राक्ष बागायतदार अर्थिक संकटाच्या खाईत ढकलला जाऊ लागला आहे. परिस्थिती अशीच राहिली, तर द्राक्षबागा तोडून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकर्‍यांसमोर शिल्लक राहणार नाही. यामुळे जिल्ह्यातील द्राक्षशेती उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.

जिल्ह्यात एकूण 33 हजार 791 हेक्टर क्षेत्रावर विविध जातीच्या द्राक्षबागा आहेत. सुमारे 26 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे ही बाजारपेठेमध्ये जात असतात. सुमारे साडेचार हजार हेक्टरवरील द्राक्षांची निर्यात होते, तर सुमारे साडेआठ हजार हेक्टर द्राक्षांपासून बेदाणा तयार केला जातो. जिल्ह्यामध्ये दरवर्षी द्राक्ष विक्रीतून 5 हजार कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल होते. परंतु अलीकडच्या दोन – तीन वर्षांमध्ये द्राक्षांचा पीकछाटणी हंगाम दीड-दोन महिना उशिरानेच सुरू होत आहे. सप्टेंबरअखेरीस पीक छाटण्या सुरू होणे अपेक्षित असताना ऑक्टोबरअखेर पीकछाटणीचा हंगाम सुरू होतो. 33 हजार 791 हेक्टर क्षेत्रावरील पीक छाटणी पूर्ण होण्यास डिसेंबर उजाडतो.

पीक छाटणी लांबत चालल्याने हंगाम ऐन भरात आला असताना पावसाचा फटका बसू लागला आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पोंगा अवस्थेत असलेली द्राक्षे दरवर्षीच डाऊनीसारख्या रोगास बळी पडत आहेत. जिल्ह्यात 25 ते 30 टक्के द्राक्षबागा डाऊनी आणि भूरीसारख्या रोगाला बळी पडत आहेत, तर पोंगा अवस्थेतून वाचलेली बहुतांश बागेतील द्राक्षे फुलोरा अवस्थेत असताना पावसात कुजून किंवा गळून जात आहेत. जवळपास 25 टक्केच्या आसपास द्राक्षबागेतील घड कुजल्याने गळून पडतात. याव्यतिरिक्त विक्रीस तयार झालेल्या द्राक्षांना पावसामुळे तडे जातात.

पावसामुळे आलेल्या डाऊनी, करपा, भूरी यासारख्या रोगामुळे द्राक्षगळ आणि घडकुजीने जिल्ह्यातील सुमारे 20 हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्रावरील द्राक्षशेतीला फटका बसतो. पावसाच्या तडाख्यात अंदाजे 2 लाख टन द्राक्षे दरवर्षी मातीमोल होतात. अस्मानी संकटामुळे वाया गेलेल्या द्राक्षांची बाजारभावातील किंमत अंदाजे दीड हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.

मानवनिर्मित संकटे सुद्धा द्राक्ष शेतीच्या मुळावर उठलेली आहेत. देशात कुठेही वादळ अथवा नैसर्गिक आपत्ती आली तर आपत्तीमुळे मार्केट बंद पडलेले आहे, मार्केटमध्ये दर पडले आहेत, अशी कारणे सांगून व्यापारीच द्राक्षांचे दर पाडतात. तसेच उधारीवर द्राक्षे घेऊन जाणारे बहुतांश व्यापारी उत्पादक शेतकर्‍यांचे पैसे बुडवून पलायन करतात. व्यापार्‍याने केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या बाबतीत पोलिस ठाण्यात तक्रार देता येत नाही. तक्रार दाखल केली तरी ते पैसे वसूल होणे फार अवघड असते. शेवटी शेतकर्‍यांना त्या पैशावर पाणी सोडावे लागते. शेतकर्‍यांना दरवर्षी सरासरी 500 कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

Back to top button