

Rupali Patil Clarifies on NCP Notice: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाकडून पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसीनंतर अखेर मौन सोडत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे की, “मी कुठेही पक्षाची शिस्त मोडलेली नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला असून माझ्या हेतूविषयी गैरसमज पसरवला गेला.”
अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांना नुकतीच कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. त्यात म्हटलं होतं की त्यांनी पक्षाच्या शिस्तीचा भंग करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या संदर्भात अयोग्य टिप्पणी केली. ही नोटीस पक्षाचे राज्य सचिव संजय खोडके यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आली होती.
रूपाली पाटील यांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आलं होतं, अन्यथा कारवाई होईल असा इशारा देण्यात आला होता. या प्रकरणानंतर त्यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन काढून टाकण्यात आलं होतं.
रूपाली पाटील यांनी आपल्या खुलासा पत्रात म्हटले आहे की, “मी कुठेही पक्षाविरोधी विधान केलेले नाही. मी केवळ एका मुद्द्यावर महिला आयोगाच्या भूमिकेशी असहमत होते. डॉ. संपदा मुंडे यांच्या संदर्भात आयोगाने घेतलेली भूमिका योग्य नाही असं मला वाटलं, एवढंच मी सांगितलं. त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.”
त्या पुढे म्हणाल्या, “मी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आदर राखत आणि पक्षाच्या मूल्यांचा सन्मान ठेवत माझं मत व्यक्त केलं. मात्र काहींनी हे माझं मत पक्षविरोध म्हणून घेतलं. हा माझ्यावर झालेला अन्याय आहे.”
रूपाली पाटील यांनी आश्चर्य व्यक्त करत सांगितलं की, “मला नोटीस का देण्यात आली याचं कोणतंही कारण सांगण्यात आलेलं नाही. मी पक्षाशी प्रामाणिक आहे, नेहमी पक्षाच्या भूमिकेप्रमाणेच काम केलं आहे.” त्यांनी यावरही भर दिला की त्यांनी नेहमी महिलांविषयी संवेदनशील भूमिका घेतली असून त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये.