

Three-Car Bomb Plot Busted After Red Fort Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. तपासात समोर आलं की हा हल्ला एकाच कारपुरता मर्यादित नव्हता तर तीन वेगवेगळ्या गाड्यांमधून सिरीज ब्लास्ट (serial blasts) घडवून आणण्याची तयारी करण्यात आली होती.
या संपूर्ण दहशतवादी मॉड्युलने तीन कार खरेदी केल्या होत्या —
पहिली हुंडई i20, ज्यामध्ये लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला.
दुसरी लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट, क्रमांक 0458, ती फरीदाबादमध्ये आढळली.
तर तिसरी मारुती ब्रेझा, हिचा शोध अजूनही सुरू आहे.
सुरक्षा यंत्रणांनी या तिसऱ्या कारसह काही संशयित वाहनांसाठी BOLO (Be On the Lookout) अलर्ट जारी केला आहे. असा संशय व्यक्त करण्यात येतोय की या गाड्यांमध्येही स्फोटक पदार्थ लपवण्यात आले असावेत.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, हल्लेखोर केवळ स्फोटावर थांबणार नव्हते ते अमोनियम नायट्रेट आणि RDX च्या मिश्रणाचा वापर करून सिरीज स्फोट घडवण्याच्या तयारीत होते आणि नंतर असॉल्ट रायफल्सने फायरिंग करून भीती पसरवण्याचा कट रचला होता. अजून धक्कादायक बाब म्हणजे या गटाने 25 नोव्हेंबर रोजी अयोध्या येथील राम मंदिरावर मोठा हल्ला करण्याचा प्लॅन आखला होता.
लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या i20 कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे DNA नमुने घेतले गेले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार FSL टीमने हे नमुने उमर नबीच्या कुटुंबाकडून घेतलेल्या DNA शी जुळवले. जम्मू-कश्मीर सुरक्षा संस्थांनी सांगितलं की हे नमुने दिल्लीला पाठवले गेले असून, प्राथमिक अहवालात DNA मॅच झाले आहेत. यानंतर ही केस राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आली आहे.
स्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठका घेतल्या.
या बैठकींमध्ये गृह महासचिव गोविंद मोहन, IB प्रमुख तपन डेका, दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा, NIA प्रमुख सदानंद दाते आणि जम्मू-कश्मीरचे DGP नलिन प्रभात (व्हर्च्युअली) सहभागी झाले.
अमित शाह यांनी सांगितलं की “या हल्ल्यात सहभागी प्रत्येक व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल.” प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूतान दौर्यावरून फोनवरून घटनेची माहिती घेतली, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोलातून थेट अमित शाह यांच्याशी संवाद साधून तपासाचा अहवाल मागवला. यानंतर गृहमंत्रालयाने अधिकृतरित्या केसची चौकशी NIA कडे सोपवण्याचा निर्णय घेतला.