

पुणे : राज्यात यंदा उन्हाळी हंगामात सरासरीपेक्षा तब्बल 560 टक्के पाऊस जास्त झाला आहे. 1 मार्च ते 31 मेपर्यंतचा हा हंगाम असला, तरीही सर्वच पाऊस यंदा 17 ते 27 मे या दहा दिवसांत बरसला आहे. असा पाऊस 107 वर्षांपूर्वी 1918 मध्ये झाला होता. मे महिन्यात सर्वच जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. मात्र, हिंगोली आणि जळगाव या दोनच जिल्ह्यांत पाऊस कमी झाला आहे. हिंगोलीत सरासरीच्या अवघा एक, तर जळगाव जिल्ह्यात 22 टक्के अधिक पाऊस झाला.
यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने अनपेक्षित पाऊस दिला. कारण, समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने झाले. तसेच, हवेचे दाब आणि वाऱ्याची दिशा अनुकूल होताच राज्यात 17 ते 27 मेदरम्यान अतिवृष्टी झाली. याआधी मे 1918 मध्ये असा पाऊस झाला होता. इतकीच नोंद हवामान विभागाच्या दफ्तरी आहे. उन्हाळी हंगामात राज्याची सरासरी 71.6 मि.मी. इतकी आहे. पण, यंदा तो 681.4 मि.मी. इतका पडला. याची टक्केवारी काढली तर राज्यात उन्हाळी हंगामात सरासरीच्या तब्बल 560 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
वाढलेले तापमान, हवेचे दाब आणि वाऱ्याची दिशा, याचा परिणाम यंदाच्या उन्हाळी हंगामाच्या शेवटी झाला. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराचे तापमान 31 अंशांवर गेले होते. त्यामुळे बाष्पीभवन प्रचंड वेगाने झाले. प्रशांत महासागरात मात्र 13 ते 26 अंश इतके कमी तापमान असल्याने वारे हे भारतात वेगाने आले. हवेचे दाब समुद्रावर 1010, तर देशात 998 हेक्टा पास्कल इतके होताच 17 ते 27 मे या दहा दिवसांत अतिवृष्टी झाली, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली. तर पुणे आयएमडीचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, की मेमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील, असा अंदाज दिलेला होता.
म्हणजे, पावसाचे प्रमाण जास्त राहील, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मेमध्ये जो पाऊस झाला तो विक्रमी झाला तसेच मान्सून देखील राज्यात विक्रमी वेळेत आला.