

पेण शहर : रायगड जिल्हा परिषद अंतर्गत प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील रा.जि.प. शाळा बोरगावने प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर आता याच शाळेने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल पेण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शर्मिला शेंडे यांनी अभिनंदन केले.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन 2025 - 26 या शैक्षणिक वर्षात शालेय परिसरात परसबाग विकसित करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने तालुक्यातील अनेक शाळांनी मोठ्या प्रमाणात शाळा व्यवस्थापन समिती, पालक व शिक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नांनी परसबाग विकसित देखील केल्या. शासनाने अशा उत्कृष्ट परसबागांची केंद्रनिहाय, तालुका स्तरीय स्पर्धा घेऊन प्रथम तीन क्रमांक जिल्हा स्तरावर पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पेण तालुक्यातील परसबाग स्पर्धेत बोरगांव शाळेने प्रथम क्रमांक पटकावला असून आता याच स्पर्धेत जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविण्याने बोरगाव शाळेने जिल्ह्यामध्ये तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.
बोरगाव जिल्हा परिषद शाळेने शालेय परिसरात परसबाग विकसित करून परसबागेत वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या,पालेभाज्या यांचे शाळेतच सेंद्रीय खत निर्माण करून या सेंद्रिय खताचा वापर करून भाज्या उत्पादित करून त्याचा वापर शालेय पोषण आहार मध्यम भोजनात करून उत्कृष्ट परसबाग निर्माण केली आहे.परसबागेत वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे असून प्रत्येक झाडाला विद्यार्थ्यांचे नाव देऊन त्यांच्या संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच प्रत्येक झाडाला कोड लावले आहे जेणेकरून त्या झाडांची माहिती मोबाईल द्वारे स्कॅन करून मिळवली जाईल.
त्याचप्रमाणे प्रत्येक झाडाला स्लोगन म्हणी यांचे कार्ड लावले आहेत.पर्यावरणाचे रक्षण व शेती विषयक सखोल माहिती या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मदतीने अत्यंत उत्तम प्रकारची व विविधता असलेली पालेभाज्या फळभाज्या, फळझाडे, औषधी वनस्पती, सुशोभीकरण वनस्पती इत्यादी लागवड करण्यात येऊन परसबाग फुलविण्यात आली आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महेश पाटील सहशिक्षिका संगीता काळे व विद्यार्थ्यांनी परसबाग फुलविण्यासाठी परिश्रम घेतले.
आमच्या शाळेला आजपर्यंत शासनाच्या माध्यमातून सन 2023 - 24 सालचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक, तालुका स्तरावर 2014 - 15 मध्ये परसबाग स्पर्धेत द्वितीय क्रमांक, जिल्हा स्तरावर प्रोत्साहनपर बक्षीस, आणि यंदाचा तालुका स्तरावरील द्वितीय क्रमांक तर नुकताच जिल्हा स्तरावरील द्वितीय क्रमांक असे पुरस्कार मिळाल्याने अशा प्रकारचे काम करण्याची अधिक स्फूर्ती निर्माण झाली आहे. त्यात माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा असणारच आहे. गटशिक्षणाधिकारी शर्मिला शेंडे, पोषण आहार अधीक्षक अरुणादेवी मोरे यांसह ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालक वर्गाचे चांगल्या पद्धतीचे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्यामुळे हा पुरस्कार शाळेला मिळाला आहे.
महेश पाटील, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद, शाळा बोरगाव